Advertisement

'नाणार' होऊ नाय देणार! मनसेनं फोडलं ताडदेवमधलं प्रकल्पाचं कार्यालय


'नाणार' होऊ नाय देणार! मनसेनं फोडलं ताडदेवमधलं प्रकल्पाचं कार्यालय
SHARES

''फेरीवाले हटाओ'' म्हणत आधी फेरीवाल्यांना आणि त्यापाठोपाठ मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांना मनसे स्टाईल दणका दिल्यानंतर मनसेनं आपला मोर्चा कोकणातील नाणार प्रकल्पाकडे वळवला आहे. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुलुंड येथील सभेत नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणार नाही असं ठणकावताच सोमवारी दुपारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताडदेवच्या एसी मार्केटमधील रत्नागिरी रिफायनरीच्या कार्यालयाची तोडफोड केली.


मनसेची उडी

स्थानिकांचा विरोध डावलून रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार इथं रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स (आरआरपीसीएल) तेलशुद्धीकरण प्रकल्प राबवत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. शिवसेनेनं सुरूवातीपासूनच हा विषय रेटून धरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला आव्हान दिलं आहे. त्यात उडी घेत राज यांनीही मुख्यमंत्र्यांना नाणारवरून टार्गेट केलं. ''नाणार प्रकल्प चंद्रावर न्या नाही तर कुठंही न्या पण हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीत होऊ देणार नाही'', असा त्यांनी इशारा दिला.


'असं' फोडलं कार्यालय

हा इशारा देऊन १२ तास उलटतं नाही तोच मनसे कार्यकर्त्यांनी नाणारविरोधात मनसे स्टाइल आंदोलनास सुरूवात केली. मनसेच्या कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्या नेतृत्वाखाली २० ते २५ कार्यकर्ते सकाळी ९ वाजता रत्नागिरी रिफायनरीच्या ताडदेवमधील कार्यालयाजवळ पोहोचले. पण कार्यालय बंद असल्यानं ते आल्या पावली परतले. पण त्यानंतर पुन्हा दुपारी ३ वाजता हे मनसे कार्यकर्ते रत्नागिरी कार्यालयात पोहोचले नि जे मिळेल ती वस्तू उचलून त्यांनी कार्यालयाची तोडफोड करण्यास सुरूवात केली. तोडफोड झाल्यानंतर या कार्यकर्त्यांनी तिथून पळ काढला.


पोलिसांचा पंचनामा

दरम्यान तोडफोडीची माहिती मिळाल्याबरोबर ताडदेव पोलिस घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांकडून पंचनामा सुरू असून त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.


'आम्हाला गुन्हा मान्य'

राज ठाकरे यांनी हा प्रकल्प होणार नाही म्हटल्यानंतर होणार नाहीच हेच आम्ही मनसे स्टाईल आंदोलनातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. आम्हाला आमचा गुन्हा मान्य आहे, मनसे कार्यकर्ते पळून जाणारे नाहीत. आम्ही ५ कार्यकर्ते, ज्यांनी प्रत्यक्षात तोडफोड केली ते, सोमवारी रात्री ताडदेव पोलिस ठाण्यात हजर राहणार अाहोत.
- सचिन गोळे, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना

पुढे आमच्याविरोधात जी काही कारवाई होईल त्या कारवाईसाठीही आम्ही तयार असल्याचंही गोळी यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितलं.



हेही वाचा-

आशिष शेलारांनी का घेतली राज ठाकरेंची भेट?



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा