Advertisement

दहिसरमध्ये मनसेचं स्कूल युनिफाॅर्ममध्ये आंदोलन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासगी शाळांच्या मनमानीविरोधात दहिसरमध्ये चक्क शाळेचा गणवेश अर्थात स्कूल युनिफाॅर्म परिधान करत अनोखं आंदोलन केलं.

दहिसरमध्ये मनसेचं स्कूल युनिफाॅर्ममध्ये आंदोलन
SHARES

सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू व्हावी, राज्यात सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळं सुरू व्हावीत, यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (mns) पदाधिकाऱ्यांनी खासगी शाळांच्या मनमानीविरोधात दहिसरमध्ये चक्क शाळेचा गणवेश अर्थात स्कूल युनिफाॅर्म परिधान करत अनोखं आंदोलन केलं. 

कोरोना विषाणूच्या (coronavirus) प्रादुर्भावामुळे मुंबई शहर आणि परिसरातील सरकारी तसंच खासगी शाळांचे प्रत्यक्ष वर्ग अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांचा भर आॅनलाईन शिक्षणावरच आहे. बहुतांश शाळांनी आॅनलाईन वर्गांच्या माध्यमातूनच बऱ्यापैकी अभ्यासक्रम पूर्ण करत आणला आहे. ही चांगली बाब असली, तरी काही शाळांकडून विद्यार्थ्यांची उपस्थिती, होम वर्क, परीक्षा आणि शालेय शुल्काच्या बाबतीत मनमानी देखील केली जात आहे. या मनमानीविरोधात दहिसरमधील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शालेय गणेवश घालून अनोखं आंदोलन केलं.

हेही वाचा- राज्यातील ५ ते ८ वी च्या शाळा लवकरच होणार सुरू

शाळेचं शर्ट, हाफ पँट, पाठिवर दप्तर आणि गळ्यात पाण्याची बाटली या पद्धतीने मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावरुन मूक पदयात्रा केली. या अनोख्या विरोध प्रदर्शनात मोठ्या संख्येने मनसैनिक सामील झाले होते. रस्त्यावरून शालेय गणवेशात जाणाऱ्या मनसैनिकांना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकीत होत होतं. या आंदोलनाने सर्वच स्थानिकांचं लक्ष वेधून घेतलं. 

दरम्यान, ५ ते ८वी वर्गाच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागानं मान्यता दिल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्य सरकारनं नुकतीच ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील कोविडची स्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेण्यास सांगितलं आहे. त्यानुसार २३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये पुन्हा सुरू झालेल्या शाळांमध्ये ३ लाखाहून अधिक विद्यार्थी सामील झाले आहेत. तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक इ. मोठ्या शहरांमधील शाळा कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाकडून अद्याप बंदच ठेवण्यात आल्या आहेत.

(mns party workers wear school uniform to protest against arbitrariness of private schools in dahisar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा