Advertisement

पळसाला पाने तीन, दादर-माहिमच्या गडावर पुन्हा किल्लेदार


पळसाला पाने तीन, दादर-माहिमच्या गडावर पुन्हा किल्लेदार
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवनिर्माण करण्यासाठी आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षातील नेते आणि पदाधिकाऱ्यांची झाडाझडती घेत आहेत. या झाडाझडतीनंतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा खांदेपालट करण्यास सुरुवात केली असून दादर-माहिम गडाच्या रखवालीची जबाबदारी पुन्हा किल्लेदार यांच्यावर सोपवली आहे. मनसेची स्थापना झाल्यानंतर या गडाचे विभागअध्यक्ष हे यशवंत किल्लेदार होते आणि नऊ वर्षांनंतर पुन्हा त्यांच्याकडेच धुरा सोपवली आहे. नऊ वर्षांत किल्लेदार, देशपांडे आणि पाटणकर हे तीन विभागअध्यक्ष झाले असून, पुन्हा किल्लेदार यांची निवड झाल्यामुळे 'पळसाला पाने तीन' त्याप्रमाणे मनसेचे दादर-माहिम गडावरचे चेहरेही तीनच असेच म्हणण्याची वेळ मतदारांवर आली आहे.


शाखांना भेटी

लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील विभागांच्या शाखांना भेटी देऊन झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. शाखाशाखांमधील भेटींमध्ये शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष तसेच महिला पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आता कार्यकर्त्यांना अनुकूल निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.


दादर-माहिमच्या गडाचा रखवालदार

दादर-माहिम विधानसभेच्या विभाग अध्यक्षपदावरुन बाजूला सारुन संदीप देशपांडे यांची पक्षाच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली, तर या विभागअध्यक्षपदी पक्षाचे उपाध्यक्ष असलेल्या यशवंत किल्लेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. किल्लेदार हे मागील काही वर्षांपासून मनसेत बाजूला फेकले गेले होते. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी झाला होता. परंतु, गेल्या वर्षी त्यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली. त्यामुळे पुन्हा मनसेच्या राजकारणात ते सक्रीय झाले आहेत.


पुन्हा देशपांडे, किल्लेदारच

मनसेची स्थापना झाल्यानंतर दादर-माहिम गडाच्या विभाग अध्यक्षपदी प्रथम यशवंत किल्लेदार यांची नेमणूक झाली होती. किल्लेदार यांच्याकडून योग्य प्रकारे मनसेची बांधणी होत असतानाच त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आणि त्यांच्या जागी संदीप देशपांडे यांची नेमणूक करण्यात आली. देशपांडे नगरसेवक झाल्यानंतरही तेच कायम होते. परंतु, त्यानंतर माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर यांच्यावर विभाग अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. पण महापालिका निवडणुकीपूर्वी पाटणकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुन्हा संदीप देशपांडे यांची वर्णी लावण्यात आली. आता त्याच देशपांडे यांच्याऐवजी किल्लेदार यांना पुन्हा गडाची रखवाली सोपवण्यात आली आहे.


दुसरा चेहराच नाही!

किल्लेदार, देशपांडे आणि पाटणकर हेच आळीपाळीने विभाग अध्यक्ष होत असून मनसेकडे या पदासाठी आता दुसरा चेहराच नाही. पाटणकर शिवसेनेत गेले. त्यामुळे देशपांडे नाही तर किल्लेदार अशीच नावे चालवून दादर-माहिमच्या गडाच्या चाव्या आलटून पालटून त्यांच्याकडे सोपवल्या जात आहेत. त्यामुळे या भागात मनसेची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी दुसरा चेहराच नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. या विधानसभेत मनसेचे माजी नगरसेवक असतानाही पक्षाने त्यांच्याकडे ही जबाबदारी न सोपवता एक प्रकारे ते अकार्यक्षम असल्याचेच दाखवून दिले. या सर्व माजी नगरसेवकांपैकी एकमेव संदीप देशपांडे हेच कार्यक्षम असून बाकीचे माजी नगरसेवक निष्ठावान असले, तरी जे स्वत: निवडून येऊ शकत नाहीत, ते पक्षाची बांधणी काय करणार? याच विचाराने मनसेकडून अविश्वास दाखवला जात असल्याचे दिसून येते.




हेही वाचा

2019 साठी राज ठाकरेंचे 'नव'निर्माण


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा