Advertisement

मोर्चाला गर्दी जमवायची कशी? मनसेची रेल्वे प्रवाशांना भावनिक साद


मोर्चाला गर्दी जमवायची कशी? मनसेची रेल्वे प्रवाशांना भावनिक साद
SHARES

फेसबुकवर धमाकेदार एन्ट्री करत पुन्हा एकदा चार्ज झालेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी सर्वसामान्य मुंबईकरांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत. एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये २३ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे पुन्हा एकदा लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मेट्रो सिनेमा ते चर्चगेट स्थानक, असा मोर्चा काढण्यात येणार आहे. 


गर्दी तर हवीच...

परंतु मोर्चात गर्दी करायची असेल, तर माणसे हवीत. मात्र लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मनसेचा धुव्वा उडाल्याने पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेकडे पाठ फिरवली आहे. कार्यकर्तेच हाताशी नसल्याने पदाधिकाऱ्यांकडून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रेल्वे प्रवाशांना केले जात आहे. मोर्चाची गर्दी रेल्वे प्रवाशांच्या माध्यमातून वाढवण्याचा निर्धार मनसेने केला आहे. या दुर्घटनेबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारतानाच राजकारणात गमावलेला सूरही पुन्हा मिळण्याचा मनसेचा प्रयत्न असणार आहे.


प्रवासीही झाले अवाक्

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, विभाग संघटक संतोष धुरी, संदीप दळवी आदी पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी रेल्वे लोकलमध्ये फिरून प्रवाशांना आवाहन केले. या आंदोलनाच्या माध्यमातून भाजपप्रणित सरकारलाही लक्ष्य केले जाणार आहे. मनसेच्या अनोख्या प्रचारामुळे रेल्वे प्रवासीही अवाक् झाले आहेत.


राज यांची भावनिक साद

''एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत माणसं मरण पावली. कारण रेल्वे प्रशासनानं आणि सरकारनं लोकांच्या सुविधांचा विचारच आतापर्यंत केलेला नाही. सरकार लोकांना साध्या सुविधाही देऊ शकत नसेल, तर अशा सरकारचा काय उपयोग? हा मोर्चा रेल्वे प्रशासनाविरोधात असला, तरी हा मोर्चा पक्षाचा नाही. हा मोर्चा जनतेचा मोर्चा आहे, राग, चीड, व्यक्त करण्याची हिच वेळ आहे, तेव्हा भविष्यात येऊ पाहणारी याहून गंभीर परिस्थिती टाळायची असेल, तर मोर्चात सामील व्हा,'' असे भावनिक आवाहन करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईकरांना साद घातली आहे.


राज यांचे पत्र वाचा -



'असा' असेल मोर्चाचा मार्ग 

  • सकाळी ११.३० वाजता - मेट्रो सिनेमागृह चौकात राज ठाकरे यांचे आगमन
  • राज आल्यानंतर मोर्चाला सुरूवात
  • महर्षी कर्वे रोड मार्गे मोर्चा रवाना
  • चर्चगेटच्या पश्चिम रेल्वे मुख्यालयाजवळ मोर्चा येईल
  • राज आणि विविध रेल्वे प्रवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ प. रेल्वे मुख्यालयात जाणार
  • पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतील
  • चर्चेनंतर राज मोर्चेकऱ्यांना संबोधित करतील 



 या आधीचे मोर्चे

मनसेच्या स्थापनेनंतर राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला होता. ऑगस्ट २०१२ ला गिरगाव चौपाटी ते आजाद मैदान असा जाहीर मोर्चा काढून त्यांनी अल्पसंख्याक समाजाकडून पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला होता. राज ठाकरेंच्या आंदोलनामुळे तत्कालीन पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांना त्यांच्या पदावरून हटवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला होता.




रेल्वे प्रवासी संघटनेचा पाठिंबा

राज ठाकरे यांच्या या मोर्चामध्ये रेल्वे वाहतूक प्रवासी संघटनांचा देखील पाठिंबा मिळत आहे. रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन आपल्या समस्या मांडत मोर्चाला पाठिंबा दिल्याचे सांगितले.


हेही वाचा - 

'वाढते लोंढे थांबत नाहीत, तोपर्यंत मुंबईचा विकास नाही' - राज ठाकरे



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा