विधानसभेच्या प्रचाराचा हा रणसंग्राम 18 तारखेच्या दुपारी बंद होईल. तोपर्यंत संपूर्ण राज्यात पोहोचण्याचा सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे. अशात प्रचार बंद होण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 17 नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि राज ठाकरेंच्या मनसेने अर्ज केले होते. अखेर राज ठाकरे यांना 17 नोव्हेंबरला सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे.
शिवाजी पार्कवर सभा घेऊन निवडणुकीच्या प्रचारातील शेवट करावा अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. यासाठी दोन्ही पक्षांनी अर्ज केले होते. त्यामुळे दोघांपैकी शिवाजी पार्क कोणाला मिळणार याची उत्सुकता लागली होती. पण अखेर मनसेला शिवाजी पार्कवर सभा घेण्याची परवानगी मिळाली आहे.
मनसेने शिवसेनेच्या आधी शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी मागितली होती. त्यामुळे प्रथम येणाऱ्याला प्राधान्य यानुसार मनसेला परवानगी मिळाली आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 17 तारखेला सभा घेण्यासाठी महानगरपालिका आणि राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र दिले होते. विशेष म्हणजे 17 नोव्हेंबर हा बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आहे आणि त्यामुळेच शिवसेना ठाकरे गटाला या ठिकाणी सभा घ्यायची आहे. त्या दिवशी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतील असे उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हेही वाचा