Advertisement

काँग्रेसची मुंबईत 'प्यार की झप्पी'वाली पोस्टरबाजी

रविवारी मुंबई काँग्रेसने राहुल यांच्या कृतीचं समर्थन करत 'नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे…' अशी टॅगलाइन असलेले पोस्टर अंधेरीसह काही भागात लावत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय.

काँग्रेसची मुंबईत 'प्यार की झप्पी'वाली पोस्टरबाजी
SHARES

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'प्यार की झप्पी'वरून सध्या देशात संमिश्र प्रतिक्रिया उमटत अाहेत. त्यातच रविवारी मुंबई काँग्रेसने राहुल यांच्या कृतीचं समर्थन करत 'नफरत से नहीं, प्यार से जीतेंगे…' अशी टॅगलाइन असलेले पोस्टर अंधेरीसह काही भागात लावत भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने रविवारी मुंबईत असल्याने या पोस्टरबाजीवरून आता राजकारण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


नेमकं काय घडलं?

लोकसभेत शुक्रवारी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना भाजपा आणि आरएसएसला उद्देशून ''माझ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष आहे. त्यामुळेच तुम्ही माझी खिल्ली उडवून, मला शिव्या देऊन बोलू शकता. परंतु माझ्या मनात तुमच्याबद्दल तिरस्कार नाही असं म्हणत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक मिठी मारली. आम्ही द्वेषाने नव्हे, तर प्रेमाने मन जिंकणार असं म्हणत मारलेल्या या मिठीवर देशभरात चर्चेला उधाण आलं. राहुल यांची कृती योग्य की अयोग्य यावर वादविवाद होऊ लागले.


कुठे लावलेत पोस्टर?

अशातच मुंबई काँग्रेसने राहुल यांच्या कृतीचं समर्थन करणारे पोस्टर्स अंधेरीसोबतच जोगेश्वरी, दादर, विक्रोळी, सीएसएमटी परिसरात लावले आहेत.



काय आहे पोस्टरवर?

काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या मार्गदर्शनाखाली लावण्यात आलेल्या या पोस्टरवर राहुल गांधी पंतप्रधानांना लोकसभेत मिठी मारतानाचा फोटो छापण्यात आला आहे. या फोटोच्या बाजूला नफरत से नही प्यार से जीतेंगे अशी टॅगलाइन मोठ्या टाइपमध्ये छापण्यात आली आहे. या पोस्टरवर राहुल, सोनिया गांधी आणि संजय निरूपम यांचे फोटो आहेत. या पोस्टरचे फोटो व्हाॅट्सअॅप, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवरून चांगलेच व्हायरल झाले आहेत.


पोस्टरवाॅर रंगणार?

अमित शहा मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत असल्याने भाजपाला खोचक सल्ला देणारे हे पोस्टर्स सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे भाजपाकडूनही पोस्टरच्या रुपाने काँग्रेसवर प्रतिहल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे.



हेही वाचा-

खड्ड्यांमुळं जीव जात असताना मनसे गप्प बसणार नाही - राज ठाकरे

शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करून महाराष्ट्राची मान झुकवली - विखे पाटील



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा