Advertisement

खड्ड्यांमुळं जीव जात असताना मनसे गप्प बसणार नाही - राज ठाकरे


खड्ड्यांमुळं जीव जात असताना मनसे गप्प बसणार नाही - राज ठाकरे
SHARES

मुंबईसह ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई परिसरात खड्डेच खड्डे झाले असून हे खड्डे सर्वसामान्यांसाठी जीवघेणे ठरत आहेत. त्यामुळं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खड्ड्यांविरोधात मुंबईसह राज्यभर आंदोलन छेडलं असून मनसे कार्यकर्त्यांवर खटले दाखल केले जात आहेत. अशा कार्यकर्त्यांच्या पाठिशी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे उभे ठाकले आहेत.  मनसैनिक अशा खटल्यांना, कारवायांना घाबरत नसून खड्ड्यांमुळे नाहक नागरिकांचा बळी जात असेल तर मनसैनिक गप्प बसणार नाहीत, असा इशाराच राज ठाकरे यांनी ट्विट करत दिला आहे.



असंवेदनशील कारभार

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-भिवंडी इथल्या पालिकेच्या रस्त्यांपासून ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांपर्यंत सर्वच रस्त्यांवर खड्डे आहेत. हेच चित्र पुण्यापासून चंद्रपुरपर्यंत दिसत असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी खड्ड्यांवरून पालिका आणि इतर यंत्रणांवर निशाणा साधला आहे. पालिका आणि या यंत्रणांच्या बेजबाबदार-असंवेदनशील कारभारामुळं रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न पडत असून ही परिस्थिती राज्यभर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. खड्ड्यात पडून नागरिकांचा जीव जातोय हे चित्र दुर्दैवी असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी खड्ड्यांच्या प्रश्नावर आता मनसे गप्प बसणार नाही ,असा इशारा पालिका,  इतर यंत्रणा आणि राज्य सरकारला दिला आहे.


नागरिकांचा रोष आंदोलनातून

खड्डे भरले जावेत, यंत्रणांना जाग यावी यासाठी सायन-पनवेल मार्गावर आंदोलन केलं, कल्याण-डोंबिवली पालिकेवर मोर्चा नेला, पुण्यातील प्रशासकीय कार्यालयात तिरडी ठेवून निषेध केला, चंद्रपुरमध्ये खड्ड्यात मत्सपालन केलं, पालघरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळं लावलं, मंत्रालयासमोर प्रतिकात्मक आंदोलन केलं, मुंबईत टोलबंद आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनामागं एकच हेतू होता तो म्हणजे यंत्रणांना लाज वाटावी आणि परिस्थिती सुधारावी. सामान्य नागरिकांच्या मनात जो रोष आहे तोच रोष आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. 


यापेक्षाही तीव्र आंदोलन करू

 या आंदोलनाची भिती आता सरकारला वाटत असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला आहे. याच भितीपोटी मनसैनिकांवर खटले दाखल केले जात आहेत, त्यांना अटक केली जात आहे. पण या खटल्यांना-कारवायांना मनसैनिक घाबरत नाही. गेल्या काही दिवसांत मनसैनिकांच्या आंदोलनानं महाराष्ट्र ढवळून काढला असून या सर्व मनसैनिकांचा मला अभिमान आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो, असं म्हणत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना बळ दिलं आहे. तर लवकरात लवकर रस्त्यांची परिस्थिती सुधारली नाही अाणि नागरिकांना उत्तम रस्ते मिळाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला आहे.



हेही वाचा - 

खड्ड्यांची भूक जास्त, पण कोल्डमिक्सच कमी

खूशखबर : सॅनिटरी नॅपकीन झालं जीएसटी फ्री





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा