Advertisement

म्हणून भाजपा-शिवसेना युतीला मुंबईत यश मिळालं

२०१४ च्या निवडणुकीत मुंबईतील ६ जागांपैकी भाजपा-शिवसेनेला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या होत्या. त्यानुसार यंदाही युतीने ६ जागा ताब्यात घेत काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत केलं.

म्हणून भाजपा-शिवसेना युतीला मुंबईत यश मिळालं
SHARES

देशात भाजपाने एकट्याच्या जोरावर बहुमत मिळवत ३०३ जागांवर कब्जा केला आहे. तर 'एनडीए'तील सहकारी पक्षांसोबत ३५२ हून अधिक जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला सहकारी पक्षांसोबत अवघ्या ८७ जागांवरच समाधान मानावं लागलं आहे. मुंबईतही काही वेगळं घडलेलं नाही. २०१४ प्रमाणे यंदाही भाजपा-शिवसेना युतीने मोदी लाटेवर नाही, तर मोदी त्सुनामीवर स्वार होत विरोधकांना धूळ चारली आहे. यावरून देशाच्या आर्थिक राजधानीतील सर्वसामान्यांवर मोदी सरकारच्या कारभाराचा तसंच व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कायम असल्याचं दिसून आलं. 

शिवसेनेने साडेचार वर्षे भाजपावर जहरी टीका केली असली, तरी या टीकेचा बागुलबुवा न करता निवडणुकीआधी शिवसेनेला  गाेडीगुलाबीने सोबत घेण्यास भाजपा यशस्वी झाली. त्यासाठी ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचं तिकीट कापण्यासही मागेपुढं पाहिलं नाही. यांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची भूमिका निर्णायक ठरली. साडेचार वर्षे खिशात राजीनामे घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निर्णायक क्षणी माघार घेत भाजपासोबत युती केली. परिणामी युतीला मतदान करणाऱ्या मतदारांचा, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला. 

याउलट अंतर्गत गटबाजीने पोखरून निघालेल्या मुंबई काँग्रेसच्या उमेदवारांना शेवटपर्यंत भाजपा-शिवसेनेच्या नेत्यांना एकजुटीने टक्कर देता आली नाही. काँग्रेसची मतंच नाही, तर कार्यकर्तेही निवडणुकीदरम्यान विखुरलेली दिसून आली. काँग्रेसची सर्वात मोठी घोडचूक ठरली, तरी मतदारांपुढे नवे चेहरे घेऊन येण्यात आलेलं अपयश. बजुर्ग एकनाथ गायकवाड, निवडणूक लढवण्यास इच्छुक नसलेल्या प्रिया दत्त, मिलिंद देवरा, वाचाळ बडबडीमुळे सातत्याने सर्वसामान्यांची टीका झेलणारे संजय निरूपम, तसंच निवडणुकीच्या अवघ्या काही दिवस आधी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उर्मिला मातोंडकर यांना मतदारांवर जराही छाप पाडता आली नाही.

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत अधिक मताधिक्याने युतीचे उमेदवार जिंकून आले आहेत. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा असून विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. मुंबईकरांनी युतीला दिलेला कौल पाहता विधानसभेत कुणाची सत्ता येईल, हे जवळपास स्पष्टच झालं आहे.

२०१४ च्या निवडणुकीत मुंबईतील ६ जागांपैकी भाजपा-शिवसेनेला प्रत्येकी ३ जागा मिळाल्या होत्या. त्यानुसार यंदाही युतीने ६ जागा ताब्यात घेत काँग्रेस राष्ट्रवादीला पराभूत केलं. मुंबईतील युती आणि महाआघाडीच्या उमेदवारांना नेमकी किती मतं मिळाली, यावर नजर टाकूया:

लोकसभा मतदारसंघ

 पक्ष

मेदवार

मते

उत्तर मुंबई

बीजेपी

गोपाल शेट्टी

706678


काँग्रेस

उर्मिला मातोंडकर

241431

उत्तर पूर्व मुंबई

शिवसेना

गजानन किर्तीकर

570063


काँग्रेस

संजय निरुपम

309735

उत्तर मध्य मुंबई

बीजेपी

पूनम महाजन

486672


काँग्रेस

प्रिया दत्त

356667

दक्षिण मध्य मुंबई

शिवसेना

राहुल शेवाळे

423743


काँग्रेस

एकनाथ गाकवाड

272393

दक्षिण मुंबई

शिवसेना

अरविंद सावंत

421937


काँग्रेस

मिलिंद देवरा

321870

उत्तर पूर्व मुंबई

बीजेपी

मनोज कोटक

514599


राष्ट्रवादी काँग्रेस

संजय दिना पाटील

288113

दक्षिण मुंबईत शिवसेनेच्या अरविंद सावंत (४,२०,६७७) यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा (३,१९,९९७) यांचा १००,६८० मतांनी पराभव केला. दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेचे राहुल शेवाळे (४,२४,९१३) यांनी काँग्रेसचे एकनाथ गायकवाड (२,७२,७७४) यांचा १,५२,१३९ मतांनी पराभव केला. उत्तर मध्य मुंबईत भाजपाच्या पूनम महाजन (४,८१,५७२) यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त (३,३३,८०३) यांचा १,४७,७६९ मतांनी पराभव केला. उत्तर पश्चिम मुंबईत शिवसेनेचे गजानन किर्तीकर (५,२७,९६०) यांनी काँग्रेसचे संजय निरूपम (२८५७७५) यांचा २,४२,१८५ मतांनी पराभव केला. उत्तर मुंबईत भाजपाचे गोपाळ शेट्टी (६,८८,३९५) यांनी काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर (२,३५,२०१) यांचा ४,५३,१९४ मतांनी पराभव केला. तर उत्तर पूर्व मुंबईत भाजपाचे मनोज कोटक (५,१४,५९९) यांनी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील (२,८८,११३) यांना २,२६,४८६ मतांनी पराभूत केलं.



हेही वाचा-

'राज ठाकरेंनी भरावा मनोरंजन टॅक्स' - विनोद तावडे

भाजपाचा नाही तर हा भारताचा विजय - नरेंद्र मोदी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा