SHARE

काँग्रेसमधून बाहेर पडलेले नारायण राणे भाजपात जाणार की नाही जाणार? याकडे अख्ख्या राज्याचे लक्ष लागलेले असताना राणे यांनी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'ची घोषणा करत नवी राजकीय इनिंग सुरू केली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत राणे यांनी ही घोषणा करताना त्यांचा नवा पक्ष भाजपप्रणित 'राओला'त सामील होणार की नाही? यावर भाष्य करण्याचे मात्र टाळले. 

काँग्रेसची कोंडी करण्यासाठी नारायण राणे सोबत हवेतही, पण त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या स्वभावामुळे होणारा ताप नको, अशा मनःस्थितीत असलेल्या भाजपाने राणेंना नवीन पक्ष काढण्याचाा पर्याय सुचवल्याची माहिती मिळत आहे. या पत्रकार परिषदेला राणे यांचे चिरंजीव निलेश राणे उपस्थित असले, तरी अजूनही काँग्रेसमध्ये असलेले आ. नितेश राणे आणि राणे समर्थक आ. कालिदास कोळंबकर मात्र गैरहजर होते.


उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड

नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना ही कधीच सत्तेबाहेर पडणार नाही त्यांना हाकलले तरच ते सत्तेबाहेर जातील, अशी खरमरीत टीका राणे यांनी केली. उद्धव सरकारच्या निर्णयावर टीका करतात. मात्र, शिवसेनेचे मंत्री मंत्रिमंडळा बैठकीत गप्प का बसतात? एखाद्या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी अभ्यासपूर्ण सूचना का करत नाहीत? पेट्रोल, डिझेल आणि महागाई विरोधात मंत्रिमंडळात सेनेचे मंत्री काहीच बोलत नाहीत, उलट झोपा काढतात. नोटाबंदी म्हणजे देशद्रोह आहे असे म्हणता, तर नोटाबंदीविरोधात तुमच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात नोटबंदीचा निषेध का नोंदवला नाही? असा सवालही राणेंनी उपस्थित केला. 

पंतप्रधान मोदी, शरद पवार यांच्यावर टीका करण्याआधी उद्धव यांनी आत्मपरीक्षण करावे. असा खोचक सल्ला देतानाच जनतेसाठी सत्तेत गेलो म्हणता मग आंदोलन का करता? काश्मीरमध्ये भाजप सत्तेसाठी लाचारी करत आहेत, असे म्हणता तर तुम्ही महाराष्ट्रात काय करता? अशी दुटप्पी भूमिका शिवसेनेची असून उद्धव आयत्या बिळावर नागोबा आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. सत्तेत राहून भांडण करण्यापलिकडे शिवसेनेने काहीच केले नाही. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार झाला असून, त्याला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोपही राणे यांनी केला.


भाजपाबाबत मात्र सावध भूमिका

पत्रकार परिषदेत नेतृत्वापासून बुलेट ट्रेन, शेतकरी आत्महत्या, नोटाबंदी आणि भष्ट्राचाराच्या मुद्द्यावर शिवसेनेवर टीका करणाऱ्या नारायण राणे यांनी भाजपाबाबत मात्र सावध भूमिका घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणे, तसेच बुलेट ट्रेनला विरोध करणे मला पटत नसल्याचे राणे यांनी यावेळी सांगितले.


मीडियाने जीवंत ठेवलेला पक्ष 'मनसे'

बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असे म्हणणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या धमक्या पोकळ असून त्यांचा पक्ष मीडियाने जीवंत ठेवलेला पक्ष आहे, असा टोला राणेंनी लगावला. हेही वाचा -

'ही' आहे राणेंच्या राजीनाम्यामागील राजकीय खेळी!

भाजपा म्हणतेय, निलेश, नितेश नको रे बाबा !!डाऊनलोड करा Mumbai live APP  आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
ताज्या बातम्या