Advertisement

अडचणी वाढल्या! राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल


अडचणी वाढल्या! राम कदमांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल
SHARES

महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात अखेर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्यांनी गेल्या ३ दिवसांपासून घाटकोपर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडत राम कदमांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी उचलून धरली होती. अखेर या आंदोलनाची दखल घेत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. तर पोलिस उपायुक्त अखिलेश सिंग यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


अडचणी वाढल्या

'मुलींनी विरोध केला तरी तिला पळवून आणून लग्नासाठी मदत करू', असं विधान राम कदम यांनी घाटकोपर दहीहंडी उत्सवात केलं होतं. यानंतर राम कदम असे काही वादात अकडले की अजूनही हा वाद त्यांना डोकं वर काढू देत नसल्याचं चित्र आहे. तर दिवसेंदिवस राम कदम यांच्यासमोरील अडचणी वाढतच चालल्या आहेत. महिला आयोगाची नोटीस, भाजपाकडून सुरू असलेली चौकशी, राजीनाम्याची मागणी आणि आता त्यात भर पडली आहे ती अदखलपात्र गुन्ह्याची.


महिला आक्रमक

राम कदम यांच्या आक्षेपार्ह विधानानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत होता. त्यातही महिला संघटना, राजकीय पक्ष या राम कदमांविरोधातील कारवाईबाबत अधिक आक्रमक होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मनसेच्या महिला कार्यकर्त्या गेल्या तीन दिवसांपासून घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडून होत्या. राम कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा ही एकच मागणी त्यांची होती. पण गुन्हा काही दाखल होत नव्हता.


कारवाई करण्याची मागणी

शुक्रवारी दुपारी मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या एका महिला कार्यकर्तीकडून हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याचं विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे. कलम ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळं गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन आता महिला कार्यकर्त्यांकडून मागे घेण्यात आलं आहे. तर गुन्हा दाखल करून घेणं अत्यंत कठिण काम होतं, पोलिसांकडून यावेळी अत्यंत वाईट वागणूक मिळाल्याचंही यानिमित्तानं विद्या चव्हाण यांनी सांगितलं आहे. तर आता राम कदमविरोधात पुढील कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


उच्च न्यायालयात धाव

दरम्यान गुन्हा दाखल झाला असून पोलिस आता पुढील तपास करत असल्याचं पोलिस उपायुक्तांनी स्पष्ट केलं आहे. गुन्हा दाखल झाल्यानं राम कदम यांच्यासमोरील अडचणी आता नक्कीच वाढल्या आहेत. पण या अडचणी यापुढही वाढणार आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेसनं राम कदमांच्या वक्तव्याविरोधात आता थेट उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी दाखवली आहे.



हेही वाचा-

सोनाली बेंद्रेला वाहिली श्रद्धांजली! राम कदम नेटकऱ्यांकडून ट्रोल

'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?

महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा