Advertisement

'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?

''कदम यांनी माफी मागितली, त्यामुळे हा विषय आता संपला'', असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला आहे.

'विषय संपला' म्हणत भाजपाकडून कदम यांना 'माफी'?
SHARES

घाटकोपरच्या दहीहंडी कार्यक्रमात महिलांसदर्भात अक्षेपार्ह विधान करणारे भाजपा आमदार राम कदम यांच्यावर पक्षाकडून कारवाई होणार की नाही? यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असताना ''कदम यांनी माफी मागितली, त्यामुळे हा विषय आता संपला'', असं म्हणत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. पाटील यांच्या वक्तव्यावरून तरी भाजपाकडून कदम यांना याप्रकरणी अभय मिळेल, अशीच चिन्हे दिसून येत आहेत.


राज्यभरातून संताप

कदम यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभरातील महिलांनी निदर्शने, मोर्चे काढून आपला रोष व्यक्त केला. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना इ. पक्षांकडून कदम यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आली. राज्य महिला आयोगाने कदम यांच्याकडून याप्रकरणी खुलासा मागवला, तर दहिहंडी समन्वय समितीने कदम यांच्या दहीहंडीवर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली.


भाजपा नेते मूग गिळून गप्प

एवढंच सगळं होत असताना, भाजपाचे नेते, प्रवक्ते मात्र याप्रकरणी मूग गिळून गप्प होते. राम कदम यांचं प्रवक्तेपद काढून पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असंही म्हटलं गेलं. पण प्रत्यक्षात कदम यांच्यावर भाजपाकडून कुठलीही कारवाई अद्याप तरी करण्यात आलेली नाही. याउलट पाटील यांच्या विधानानंतर त्यांना पक्षाकडून अभय देण्यात येईल, असंच दिसून येत आहे.


काय म्हणाले पाटील?

'राम कदम यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे आता हा विषय संपवायला हवा. कदम महिलांना नेहमीच मदत करतात. त्यामुळे हजारो महिला त्यांना राखी बांधतात. एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता हे तपासायला हवं? जरी चुकीचा अर्थ निघत असला तरी त्यांनी माफी मागितल्यावर हा विषय संपवायला हवा. आमच्यासाठी तरी हा विषय आता संपलेला आहे. मात्र कदम यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील. लोकप्रतिनिधींनी देखील बोलताना काळजी घ्यायला हवी. एखाद्याच्या बोलण्याचा अर्थ नेमका काय होतो हे दाखवताना माध्यमांनीही काळजी घ्यायला हवी', असं पाटील प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.


दानवे यांच्याकडे लक्ष

कदम यांनी मागितलेल्या माफीनंतर आणि पाटील यांच्या वक्तव्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कदम यांच्यावर नेमकी काय कारवाई करतात, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.



हेही वाचा-

महिला आयोगाच्या दणक्यानंतर राम कदमांचा माफीनामा

आठ दिवसांत स्पष्ट कारण द्या, महिला आयोग



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा