Advertisement

मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? शरद पवारांनी सांगितलं कारण…

आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्वीकारली. तर आम्ही सर्वजण राज्यात फिरून त्यांना परिस्थितीची माहिती देत असतो, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.

मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? शरद पवारांनी सांगितलं कारण…
SHARES

कोरोनाचं संकट, निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा, पाठोपाठ अवकाळी पावसाने दिलेला मार यामुळे सर्वसामान्य जनता पिचलेली असताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन त्यांना धीर देण्याची गरज आहे. परंतु अशा कठीण परिस्थितीतही मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून करण्यात येतो. यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत? याचं उत्तर दिलं. (ncp chief sharad pawar clarifies why cm uddhav thackeray not visited outside during covid 19 pandemic)

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत होते. कुणाला वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नव्हते, तर कुणाला पोटापाण्याची चिंता सतावत होती. अशा स्थितीत मुख्यमंत्री फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून सातत्याने जनतेशी संवाद साधत असले, विविध प्रशासकीय विभागांचा आढावा घेत असले, तरी त्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून जनतेचे प्रश्न जाणून घ्यावेत आणि ढेपाळलेल्या प्रशासकीय व्यवस्थेला निर्देश द्यावेत, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु या काळात मुख्यमंत्र्यांनी घराबाहेर पडण्याचं जाणीवपूर्वक टाळलं. केवळ मंत्रालय, वर्षा बंगला, सह्याद्री अतिथीगृह आणि दादर येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक परिसरात विविध विषयांशी संबंधित बैठका घेऊन त्यांनी राज्यातील स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - राज्यात अतिवृष्टीचा इशारा कायम, गाफील राहू नका- उद्धव ठाकरे

परंतु याच काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विविध भागांना भेटी दिल्या. याचप्रकारे निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही विरोधी पक्षातील नेते, शरद पवार आणि काँग्रेस, राष्ट्रवादीमधील इतर नेते नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत असताना मुख्यमंत्र्यांनी केवळ रायगडला येऊन मदतनिधी जाहीर केला, यावर विरोधकांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आता नुकसानग्रस्त शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाही, असा प्रश्न पुन्हा विचारण्यात येऊ लागला. 

यावर पत्रकारांना प्रश्न विचारला असताना शरद पवार यांनी सांगितलं की, प्रशासनाची जबाबदारी ज्यांच्या हातात असते, त्यांना अनेक निर्णय घ्यावे लागतात. त्यासाठी त्यांना कार्यालयात थांबावं लागतं. कोरोनाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी मुंबईतच बसून सर्व जिल्ह्यांच्या संपर्कात राहून निर्णय घ्यावेत, अशी विनंती आम्ही केली होती. आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका स्वीकारली. तर आम्ही सर्वजण राज्यात फिरून त्यांना परिस्थितीची माहिती देत असतो, असं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दोन दिवसीय पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दौऱ्याला सुरुवात झाली असून, १९ ऑक्टोबर रोजी सोलापूरात पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.  तर २० आॅक्टोबर रोजी त्यांचा मराठवाडा दौरा आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री मदत जाहीर करणार का? याकडे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा