ठाणे महापालिकेच्या महापौरपदी ज्येष्ठ नगरसेवक नरेश म्हस्के यांची तर उपमहापौरपदी पल्लवी पवन कदन यांची गुरूवारी बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर महापालिकेत त्यांच्या अभिनंदन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चक्क शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन म्हस्के यांचं कौतुक करत नव्या राजकीय समिकरणावर शिक्कामोर्तब केलं.
हेही वाचा- वीर सावरकरांना भारतरत्न द्या, शिवसेनेची पुन्हा मागणी
ठाणे महापालिकेचा महापौर आणि उपमहापौरपदाची औपचारीकता पार पडल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. तसंच नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदनही केलं. यावेळी शिवसेना आमदार एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. विशेष म्हणजे या अभिनंदन सोहळ्याला आव्हाड यांनीही हजेरी लावल्याने सर्वजण आश्चर्यचकीत झाले.
त्यावर बोलताना आव्हाड म्हणाले, नरेश म्हस्के माझा जुना मित्र आहे. राजकारणापलिकडची आमची मैत्री आहे. एका सामान्य कुटुंबातील शिवसैनिकाला महापौरपदी विराजमान करून शिवसेना नेतृत्वाने जो न्याय दिला आहे, त्याचा मला निश्चितच आनंद वाटतो. मी या व्यासपीठावर आल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. परंतु आमच्या पक्षनेतृत्वाला पक्षाप्रती असलेल्या आमच्या निष्ठेची जाणीव आहे. त्यामुळे यातून कुठलेही चुकीचे अर्थ काढू नका.
ठाणे महापौरपदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्यात येणार होता. परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विनंतीचा मान राखत राष्ट्रवादीकडून कोणताही उमेदवार देण्यात आला नाही. त्यामुळे महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोध झाली.
हेही वाचा- आता चर्चा शिवसेनेसोबत, पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती
शिवसेनेचा कुठलाही आमदार नाराज नाही, एकनाथ शिंदेंचा खुलासा