Advertisement

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी नवाब मलिकांचा गंभीर आरोप

धुळ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी करून सरकारकडून अधिकचा मोबदला घेण्याचा धंदा पर्यटनमंत्री आणि धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना मलिक यांनी केलेला हा आरोप अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मानला जात आहे.

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी नवाब मलिकांचा गंभीर आरोप
SHARES

'शेतकरी जातो जिवानिशी आणि राजकारणी मात्र तुपाशी' याचाच प्रत्यय धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर येत आहे. एकीकडे या प्रकरणी विरोधकांसह सर्वच स्तरातून सरकारवर कडक शब्दांत टीका होत आहे. मात्र, काँग्रेसमधील काही नेत्यांकडून धर्मा पाटील यांचा बळी का गेला? हेच माहीत नसतानाही त्यावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी तर आता सरकारमधील मंत्र्यांवर गंभीर आरोप करत सरकारला कोंडीत पकडण्यास सुरूवात केली आहे.


रावलांचा जमीन खरेदी-विक्रीचा धंदा?

धुळ्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरात खरेदी करून सरकारकडून अधिकचा मोबदला घेण्याचा धंदा पर्यटनमंत्री आणि धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचा असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु असताना मलिक यांनी केलेला हा आरोप अत्यंत महत्वाचा आणि गंभीर मानला जात आहे.


धर्मा पाटलांना योग्य मोबदला का मिळत नव्हता?

प्रकल्पग्रस्तांवर, शेतकऱ्यांवर अन्याय करत त्यांच्या जमिनी लाटणाऱ्या, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या रावल यांच्यासह ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांंच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे. कायद्याप्रमाणे शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळायला हवा होता. पण तो मिळत नसल्यानंच शेतकरी मोबदला वाढवून देण्याची मागणी करत होते. त्यातीलच एक धर्मा पाटील आपल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत होते. पण त्यांना योग्य मोबदला मिळत नव्हता. तो का मिळत नव्हता? याचं कारण रावल यांचा जमीन खरेदी-विक्रीचा धंदा हेच असल्याचं मलिक यांनी म्हटलंय.


रावलांनीच खरेदी केली धर्मा पाटलांची जमीन

धर्मा पाटील यांची बरीचशी जमीन रावल कुटुंबियांनी विकत घेतली होती. तर मोबदल्याचा निर्णय रावल यांनी मुद्दाम राखून ठेवला होता. जेणेकरून रावल यांना अधिक जमीन विकत घेता यावी, असंही मलिक यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे. धर्मा पाटील यांच्याशी मंत्रालयात जमिनीबाबत जी बैठक होणार होती, ती बैठक रावल यांनीच रद्द केली होती, असं म्हणत मलिक यांनी रावल यांना विधीमंडळातूनही हाकलून देण्याची मागणी केली आहे.


जयकुमार रावलांनी आरोप फेटाळले

मलिक यांनी केलेले सर्व आरोप रावल यांनी फेटाळले आहेत. 'जमीन संपादनाचं काम हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात झालं होतं,' असं म्हणत रावल यांनी आता काँग्रेस-राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. तर या प्रकरणाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत रावल यांनी धर्मा पाटील यांच्या मृत्यूला त्यावेळचं काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकारच कारणीभूत असल्याचा आरोप अप्रत्यक्षपणे केला आहे.



हेही वाचा

धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : मुख्यमंत्र्यांना लाज वाटायला हवी - सुप्रिया सुळे

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा