Advertisement

काँग्रेस 1992 ची पुनरावृत्ती करेल का?


काँग्रेस 1992 ची पुनरावृत्ती करेल का?
SHARES

मुंबई - शिवसेना भाजपाची युती तुटली. 1992 नंतर प्रथमच दोन्ही पक्ष मुंबई महापालिकेत स्वबळावर लढणार आहेत. त्यामुळे 1992 ला युती न करता लढणाऱ्या या दोन्ही पक्षांचा फायदा घेत काँग्रेसपक्षाने 112 जागा मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले होते. आता पुन्हा ही संधी काँग्रेसपुढे असून, गटातटाचे राजकारण आणि अंतर्गत वादावादी असलेल्या काँग्रेसला ती साध्य करता येईल का हाच प्रमुख प्रश्न आहे.
शिवसेना आणि भाजपाची 1989 पासून यूती आहे. पण त्यानंतर झालेल्या 1992 महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्षांनी युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली. या निवडणुकीत काँग्रेसपक्षाला सर्वाधिक 112 जागा मिळाल्या. त्याखालोखाल शिवसेना 69, भाजपा 14, जनता दल 8, भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2, मुस्लिम लीग 5, कामगार आघाडी 1 असे नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे प्रदीर्घ काळानंतर काँग्रेसचे नगरसेवक चंद्रकांत हंडोरे महापौर झाले. त्यानंतर निर्मला सावंत प्रभावळकर, रा. ता.कदम. आर. आर. सिंह असे काँग्रेसचे महापौर झाले. मात्र, या सत्तेच्या शेवटच्यावर्षी काँग्रेसचे रामानंद लाड आणि पुष्पकांत म्हात्रे हे उमेदवार होते, तर शिवसेनेच्यावतीने मिलिंद वैद्य उमेदवार होते. याचवेळी विजय लोके यांच्यासह काँग्रेस नगरसेवकांनी पक्षातून फुटून वैद्य यांच्याबाजूने मतदान केले आणि काँग्रेसची सत्ता असतानाही शिवसेनेचा महापौर निवडून आला. तेव्हापासून काँगेस पक्ष महापालिकेत सत्तेपासून लांब आहे.
पण आता शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. या दुहीचा फायदा घेत काँग्रेसला सत्तेचे स्वप्न साकारता येऊ शकते. सध्या महापालिकेत काँग्रेसचे 52 नगरसेवक आहेत. अंतर्गत राजकारणामुळे आणि अस्तित्वासाठी परमिंदर भामरा, योगेश भोईर, भोमसिंग राठोड, सागर सिह ठाकूर, केशरबेन पटेल आदी नगरसेवक आणि काही माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच सपा एकत्र आल्यास मोठे परिवर्तन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 1992 ची पुनरावृत्ती घडेल का हेच आता पाहायचे आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा