महापालिकेत भाजपाने शिवसेनेचे वाजवले बारा

 BMC
महापालिकेत भाजपाने शिवसेनेचे वाजवले बारा
BMC, Mumbai  -  

मुंबई - मुंबईतील महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. परंतु, या संपाची दखल न्यायालय आणि सरकारकडून घेतली जात असताना स्थायी समिती प्रशासन मात्र याबाबत गंभीरता दाखवत नाही.

संपाबाबत प्रशासन निवेदन करत नाही आणि सत्ताधारी पक्ष 12 वाजेपर्यंत सभा संपवण्याच्या प्रयत्नात असल्याने याचा तीव्र निषेध भाजपासह काँग्रेस आणि इतर पक्षांनी व्यक्त करत सभात्याग केला. त्यामुळे बारा वाजलेल्या शिवसेनेलाही स्थायी समितीची बैठक तहकूब करण्याची वेळ आली.

स्थायी समितीच्या बैठकीत 14 विषयांपर्यंत कामकाज झाल्यावर अध्यक्षांनी स्थापत्य समितीची निवडणूक 12 वाजता असल्यामुळे ही बैठक त्वरीत आटपायचे जाहीर केले. परंतु याला भाजपाचे गटनेते मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांनी हरकत घेतली. कार्यक्रमपत्रिकेवरील पुढील विषय राखून ठेवावा, पण डॉक्टरांच्या संपाबाबत प्रशासनाने निवेदन करावे अशी मागणी कोटक यांनी केली. तर बैठक सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने यबाबत निवेदन करायला हवे होते. संपाबाबत न्यायालय तसेच सरकारकडून गंभीर दखल घेतली जात आहे, तरीही महापालिका आयुक्त या समितीला काही सांगत नाहीत, हे गंभीर असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. 

डॉक्टरांच्या संपामुळे महापालिका रुग्णालयात 260 मोठ्या आणि छोट्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत. 58 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप काँग्रेस गटनेते रवी राजा यांनी केला. यानंतरही आयुक्तांच्या प्रतिक्षेसाठी समितीचे कामकाज नियमबाह्य पद्धतीने थांबण्यात आले. पण, दहा मिनिटे उलटूनही आयुक्त न आल्यामुळे भाजपासह काँग्रेस आणि इतर पक्षांनी सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी डॉक्टरांचा संप मिटेपर्यंत स्थायी समितीची बैठक होऊ देणार नाही, असा इशारा दिला. मात्र, त्यावरही अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांच्याकडून माहिती देण्यात आली नाही. आयुक्त अधिवेशनाला गेल्याचे त्यांनी सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भाजपासह सर्वांनी सभात्याग केला. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सभेचे कामकाज तहकूब केले. शिवसेनेकडे कोणीच बोलणारे नसल्यामुळे आणि सभागृहनेत्यांचा समन्वय नसल्यामुळे भाजपाने शिवसेनेचे बारा वाजवल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Loading Comments