Advertisement

“कोरोना मृतांच्या नोंदीत ठाकरे सरकारकडून लपवाछपवी”, भाजपचा आरोप

वसई-विरार आणि ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांचे जेवढे मृत्यू झाले, त्यापेक्षा कमी मृत्यूची नोंद प्रत्यक्षात करण्यात आली आहे. एकप्रकारे ठाकरे सरकार कोरोना मृतांचा आकडा लपवत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

“कोरोना मृतांच्या नोंदीत ठाकरे सरकारकडून लपवाछपवी”, भाजपचा आरोप
SHARES

वसई-विरार आणि ठाणे महापालिका क्षेत्रात मागील काही दिवसांत कोरोनाबाधित (coronavirus) रुग्णांचे जेवढे मृत्यू झाले, त्यापेक्षा कमी मृत्यूची नोंद प्रत्यक्षात करण्यात आली आहे. एकप्रकारे ठाकरे सरकार कोरोना मृतांचा आकडा लपवत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. 

भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी हा दावा करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. १ ते १३ एप्रिल या काळात वसई-विरार शहरात २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र महापालिकेने केवळ २३ मृत्यू दाखवले आहेत. तर ठाणे महापालिका क्षेत्रात ५७ कोरोना मृत्यूची नोंद करण्यात आलेली असली, तरी स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाले असल्याची नोंद आहे, अशी आकडेवारी किरीट सोमय्या यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

यासंदर्भात बोलताना किरीट सोमय्या यांनी सांगितलं की, वसई-विरार शहरात पहिल्या १३ दिवसांमध्ये २०१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पालिकेने मात्र २३ मृत्यू दाखवले आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांना विचारलं असता, खासगी रुग्णालयातील मृत्यू आम्ही धरले नव्हते, आम्ही त्यात सुधार करू. ठाणे महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमींमध्ये ३०९ जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद आहे. परंतु केवळ ५७ कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. यावरून कोविड मृतांच्या आकडेवारीतही ठाकरे सरकार लपवाछपवी करत असल्याचं दिसत आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

हेही वाचा- कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी पंचतारांकित हॉटेलचा वापर

तर भाजप आमदार आणि वसई-विरारचे प्रभारी प्रसाद लाड यांनी देखील या विषयावरून महापालिकेला लक्ष्य केलं आहे. वसई-विरार महापालिकेचा भोंगळ आणि भ्रष्टाचारी कारभार पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलेला आहे. आयुक्त आणि प्रशासक गंगाधरन हे महापालिकेचे आयुक्त आहेत की पालकमंत्र्यांचे घरकाम करणारे गडी आहेत, हे आम्हाला कळतच नाही. खरं तर २०७ पेक्षा अधिक कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना केवळ २३ मृत्यू दाखवण्याचं काम महापालिका आयुक्तांनी केलं, असं प्रसाद लाड म्हणाले.

मागील काही दिवसांत नालासोपारा, वसई-विरार मध्ये आॅक्सिजन अभावी किमान २३ ते  २४ जणांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून जेव्हा आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा आयुक्तांकडून कुठलंही उत्तर येत नाही. माझी सरकारला विनंती आहे की कोरोनाच्या काळात तरी राजकारण आणू नका. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना माझी विनंती आहे की त्यांनी महापालिका रुग्णालयातील आॅक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीरची टंचाई याची चौकशी करून आयुक्त गंगाधरन यांना जनतेच्या सेवेसाठी काम करण्याची सक्त ताकीद द्यावी, अन्यथा आम्हाला ब्रेक द चेन परिस्थितीत आंदोलन करून ब्रेक द ब्रेन करावं लागेल, असा इशारा प्रसाद लाड यांनी दिला.

(no transparency in covid 19 death registration in vasai virar and thane alleges bjp)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा