Advertisement

मी भाजपमध्येच राहणार- खडसे

खडसे लवकरच दुसऱ्या पक्षात विस्थापित होतील, अशा चर्चांना ऊत आला आहे. मात्र आपण भाजपमध्येच राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगत खडसेंनी या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

मी भाजपमध्येच राहणार- खडसे
SHARES

एकाच पक्षात राहून ज्याने ४० वर्षे राजकीय विरोधकांशी दोन हात केले. त्याच पक्षाने एकनाथ खडसे यांना खड्यासारखं बाजूला केल्याने अधिवेशनात अनेकदा भाजप मंत्र्यांना खडसेंच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. त्यांनी काढलेल्या उंदीर घोटाळ्याची चर्चा तर अधिवेशनानंतरही सुरूच आहे. त्यामुळे खडसे लवकरच दुसऱ्या पक्षात विस्थापित होतील, अशा चर्चांना ऊत आला आहे. मात्र आपण भाजपमध्येच राहणार असून अफवांवर विश्वास ठेवू नका, असं सांगत खडसेंनी या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.


नमस्काराने चर्चांना उधाण

अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेकदा खडसेंनी भाजप मंत्र्यांना लक्ष्य केलं. त्यातून सावरता सावरता आणि उत्तर देताना भाजप मंत्र्यांच्याही नाकी नऊ आल्याचं पहायला मिळालं. आपल्याच पक्षाचे आमदार असताना आपल्याच मंत्र्यांना फैलावर घेताना अनेक भाजप आमदारांच्या व नेत्यांच्या भुवयाही उंचावल्या. त्यातच शरद पवार आणि खडसे एकत्र एकाच व्यासपीठावर आलेले असताना खडसेंनी शरद पवारांना वाकून नमस्कार केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.


पोस्ट व्हायरल

खडसेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याबाबत दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्सुक नसल्याची बाब उघडकीस झाल्याने महाराष्ट्र भाजपमधील कोणताही पदाधिकारी खडसे यांच्याशी सलोख्याचे संबध ठेवायला तयार नसल्याचं भाजपमधील पदाधिकारी खासगीत सांगत आहेत. तर विरोधक असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे यांना जाहीर कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात येत असून त्यांचा यथोचित सन्मानही केला जात आहे. त्यातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते यांच्या नावासह ते २१ आमदारांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे.


 

माझ्यासंबंधी पसरलेली बातमी खोटी असून, मी भाजपमध्येच राहणार आहे. मी भाजपचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. वारंवार विविध माध्यमातून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याने संबधित अकाऊंटची चौकशी करुन, संबंधित व्यक्तींवर सायबर क्राइम अंतर्गत गुन्हा नोंदविणार आहे.
-एकनाथ खडसे, आमदार, भाजप



या पोस्ट म्हणजे अफवा असून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असं एकनाथ खडसे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून स्पष्ट केलं आहे. मी मंत्रिमंडळात सहभागी नसल्याने आधीही अनेकांनी माझ्याबद्दल सहानुभूतीव्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या सहानुभूतीसाठी मी माझ्या पक्षातून बाहेर कसा पडणार? गेल्या ४० वर्षांपासून मी भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम करीत आहे. जिल्ह्यात-खानदेशात आपण हा पक्ष उभा केला. असं असताना मी पक्ष सोडण्याचा मनात विचारही आणू शकत नाही असं खडसेंनी स्पष्ट केलं होतं.


अशी कोणतीही पोस्ट मी किंवा माझ्या कार्यालयाकडून पोस्ट केली गेली नाही. खडसेंबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र त्यांच्या मनाविरुद्ध आणि त्यांना गृहीत धरून अशी कोणतीही माहिती आम्ही प्रसारित करणार नाही. हे नक्कीच कुठल्यातरी फेक अकाऊंटवरून माझ्या नावाचा वापर करून केलं जात आहे, त्याचं स्पष्टीकरण मी दिलं आहे.
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद



हेही वाचा-

नाथाभाऊंचा 'भुजबळ' करणं मनोरंजनाचा विषय - एकनाथ खडसे

घोटाळ्यामुळेच माहिती लपवली जातेय - एकनाथ खडसे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा