Advertisement

मोपलवारांचा न्याय मेहतांना का नाही? - विखे पाटील


मोपलवारांचा न्याय मेहतांना का नाही? - विखे पाटील
SHARES

भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतरही सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदच्युत करण्याचा न्याय राज्य सरकारने गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांना का लावला नाही? अशी संतप्त विचारणा करून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मेहतांचा राजीनामा होईपर्यंत कामकाज न चालू देण्याचा इशारा दिला आहे.


निलंबनाची मागणी विरोधकांकडून कायम

मोपलवार यांना पदच्युत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, सरकारने सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना निलंबित करण्याऐवजी केवळ पदावरून हटवल्याने त्यांचा सरकारवरील प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे त्यांच्या निलंबनाची मागणी विरोधकांकडून कायम आहे. मोपलवारांनी त्यांच्या विरोधात तक्रारी करणाऱ्या सतीश मांगले नामक तरुणाच्या अख्ख्या कुटुंबाला वेठीस धरले आहे. बुधवारी संध्याकाळी मांगले याने माझी भेट घेऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबावर सुरू असलेल्या मोपलवारांच्या दडपशाहीची इत्थंभूत माहिती दिली. एका सनदी अधिकाऱ्याची इतकी मुजोरी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी विचारणाही करून मांगले यांना सरकारने तातडीने संरक्षण द्यावे, अशी मागणीही विखे यांनी केली.


'गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून हटवा'

विरोधकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सरकारला एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवारांना पदच्युत करणे भाग पडले आहे. पण हाच न्याय सरकारने प्रकाश मेहता यांना का लावला नाही? एकनाथ खडसे यांच्यावरील आरोपानंतर सरकारने चौकशी समिती नेमून त्यांचा राजीनामा घेतला होता. त्याच पद्धतीने गृहनिर्माण मंत्र्यांना पदावरून का हटवले जात नाही? असा प्रश्न राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

तत्पूर्वी विधानसभेत बोलताना विरोधी पक्षनेत्यांनी राधेश्याम मोपलवार यांच्या चौकशीबाबत सरकारच्या उदासीन भूमिकेचे पुरावेच सादर केले. मोपलवारांविरूद्ध भाजपाच्या आमदारांनी रीतसर तक्रारी केल्या. सतीश मांगले यानेही पुरावे दिले. परंतु, त्यासंदर्भात सरकारने काहीच चौकशी केली नाही. ही वस्तुस्थिती असताना एक महिन्याच्या आत त्यांची चौकशी करण्याच्या सरकारच्या आश्वासनावर कसा विश्वास ठेवायचा? अशीही विचारणा त्यांनी केली.


ट्विटरवरही विरोध

राधेश्याम मोपलवार यांच्या कथित भ्रष्टाचाराची क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना निलंबित केले. त्यानंतर गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनम्याची मागणी सर्वच स्तरातून केली जात आहे. यावर आता ट्विटरवरही प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.








हेही वाचा

राधेश्याम मोपलवारांची 'अंशतः' गच्छंती


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा