Advertisement

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
SHARES

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी करताना सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४०० कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, राष्ट्रीय आरोग्य मिशन (एनएचएम) ही केंद्र सरकारची योजना, पण राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेची अंमलबजावणी होते. त्यामुळे उमेदवारांच्या नियुक्त्यांची प्रक्रिया ही राज्य सरकारमार्फतच होते. या योजनेत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्यांना सेवेत कायम नियुक्त्या देण्यासंदर्भातील काही विधाने मंत्र्यांकडून आल्यानंतर, कायमस्वरूपी नियुक्त्यांसाठी, संपूर्ण राज्यात आर्थिक देवाणघेवाणीला प्रचंड वेग आला आहे. यासंदर्भात दूरध्वनी संवादाच्या तीन आॅडियो क्लिप मला प्राप्त झाल्या आहेत. 

या आॅडियो क्लिपमधील संवादानुसार सुमारे २० हजार असे उमेदवार राज्यात असून त्यांना सेवेत कायम करण्यासाठी त्यांच्याकडून १ ते २.५० लाख रुपये गोळा केले जात आहेत. म्हणजेच यासाठी सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांचं कलेक्शन होत आहे. हे सारं कुणाच्या आशीर्वादाने होत आहे. याचीही सखोल चौकशी करणं गरजेचं आहे. सेवेत कायम करण्यासाठी सुमारे ४०० कोटींची उलाढाल महाराष्ट्रात होत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे.

हेही वाचा- “आरे कारशेडसाठी फक्त ७० कोटी खर्च, फडणवीसजी उरलेले ३३० कोटी रुपये कुठं गेले?”

प्रत्यक्षात उमेदवारांकडून १ लाख रुपयांचं सहमतीपत्र आणि ५०० रुपये लढा निधी असे संकलन करीत अर्जावर स्वाक्षरी घेतली जाते. आणि सोबतच १ ते २ लाख रुपयांदरम्यान रोख असलेला लिफाफा वेगळा देण्यास सांगितला जात आहे. ही रोख देताना नोटा या ५०० आणि २ हजारांच्याच असाव्यात, असंही सांगितलं जात आहे. या संवादात अनेक लोकांची नावंही असून ती इथं नमूद करत नाही. आॅडियो क्लिपमध्ये आपल्याला ती ऐकता येतील. हा पैसा देण्यासाठी अनेकांनी कर्ज घेतली आणि पैसा जमा केला. पण आता त्यांना केवळ व्याज भरावं लागत आहे. काही लोक एकमेकांना बँकेतून पैसे काढून रोख हातात ठेवा, केव्हाही भरावे लागतील, असं सांगत आहेत. (opposition leader devendra fadnavis alleges corruption in national health mission under maharashtra government)

काही खास बँक खाती सुद्धा यासाठी उघडली गेली आहेत. हा संपूर्ण प्रकार अतिशय गंभीर असून केवळ एका अभियानात सेवेतील कायम नियुक्तीसाठी अशा पद्धतीने ४०० कोटींचा भ्रष्टाचार होत असेल तर कोरोनाच्या कालखंडात आणि तेही आरोग्य क्षेत्रात किती मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतोय, याची कल्पनाही न केलेली बरी या आॅडियो क्लिपची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि सरकारमधील कुणाच्या नावाने हा गैरप्रकार होतोय, याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.   

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा