Advertisement

मुंबई ठप्प करण्यासाठी कोण जबाबदार ? फडणवीसांचा सरकारवर निशाणा

महाविकास आघाडी सरकार अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पुढाकार घेईल, अशी अपेक्षा करता येईल का? असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.

मुंबई ठप्प करण्यासाठी कोण जबाबदार ? फडणवीसांचा सरकारवर निशाणा
SHARES

वीज पुरवठा खंडीत होऊन संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. खासकरून कोविड १९ काळात. याला जबाबदार कोण? महाविकास आघाडी सरकार अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून पुढाकार घेईल, अशी अपेक्षा करता येईल का? असं म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. (opposition leader devendra fadnavis criticised maharashtra government over power failure in mumbi and MMR region)

महावितरणच्या कळवा येथील सब स्टेशनमधील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे संपूर्ण मुंबई महानगरातील वीजपुरवठा सोमवारी सकाळी अचानक खंडित झाला होता. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला. पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने लोकल ट्रॅकवरच उभ्या राहिल्या. यामुळे प्रवाशांना नाईलाजाने ट्रॅकवर उतरुन पायी प्रवास करावा लागला, रस्त्यांवरील सिंग्नल यंत्रणा बंद पडल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला, रुग्णालयातील वीजही गेल्याने रुग्णांचे हाल झाले. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. 

त्यानंतर तब्बल अडीच तासानंतर हळुहळू मुंबईतील वीज पुरवठा सुरळीत होऊ लागला. अजूनही काही भागांतील वीज पुरवठा खंडीतच आहे. त्यावरून भाजपने सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली असून संपूर्ण मुंबई ठप्प करण्यासाठी कोण जबाबदार आहे, याची चौकशी करण्याची मागणी भाजपने केली आहे.

हेही वाचा - वीज पुरवठा खंडीत कसा झाला? चौकशी करणार- नितीन राऊत

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना, अचानक वीज खंडीत झाल्याने मुंबईला जो फटका बसला, खासकरून कोविड १९ च्या काळात ते बघता महाविकास आघाडी सरकार याबाबत काही पुढाकार घेईल, अशी अपेक्षा करता येईल का? मुंबईला जागीच खिळवून ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या आयुष्यात बाधा निर्माण करण्यासाठी कोण जबाबदार आहे? ट्रेन, हाॅस्पिटल्स, पाणी पुरवठा काहीच यातून सुटलं नाही. या प्रकाराची चौकशी होऊन काही ठोस हाती येईल आणि जबाबदारी निश्चित करता येईल, अशी अपेक्षा आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक बोलावली असून या बैठकीत उर्जामंत्री नितीन राऊत, उर्जा राज्यमंत्री प्रसाद तनपुरे, उर्जा सचिव असीम गुप्ता सहभागी होणार आहेत. या बैठकीत वीज पुरवठा कशामुळे खंडीत झाला? दुरुस्तीचं काम कुठवर आलं? या सगळ्याचा आढावा मुख्यमंत्री घेणार आहेत. सोबतच भविष्यात असा बिघाड पुन्हा होऊ नये म्हणून करायचा उपाययोजनांचीही माहिती घेणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा