बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दिल्लीतील एम्स रुग्णालयाने नुकताच अहवाल जारी केला आहे. या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचं स्पष्ट केल्याने शिवसेना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. सुशांत प्रकरणावरून महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा कट रचण्यात आल्याचं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला सुरूवात झाली, तेव्हा अगदी सुरूवातीपासूनच या प्रकरणात संशयास्पद वातावरण निर्माण करून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचे प्रयत्न झाले. आता तर सीबीआयच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आम्ही तर नि:शब्द झालो आहोत.
हा सगळा प्रकार बिहार निवडणुकीच्या वातावरणनिर्मितीसाठी करण्यात आला. पण सत्य कधीही लपत नाही. ते कधी ना कधी बाहेर येतंच. या प्रकरणावरून मीडिया ट्रायल करणाऱ्या वृत्त वाहिन्या राजकारण्यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांची माफी मागितली पाहिजे. तसं होत नसेल, तर महाविकास आघाडी सरकारने त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला पाहिजे, असंही संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा - सुशांत सिंह प्रकरण: हत्या नव्हे, आत्महत्याच! एम्सचा रिपोर्ट सीबीआयला सादर
सुशांतचा मृत्यू हा आत्महत्येमुळेच झाल्याचा अहवाल एम्सने सीबीआयला दिल्याचं वृत्त आहे. हा अहवाल तयार करणारे एम्सच्या फाॅरेन्सिक मेडिकल बोर्डाचे प्रमुख डाॅ. सुधीर गुप्ता हे कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाहीत, शिवाय त्यांची शिवसेनेसोबतही जवळीक नाही. तरीही या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतील, तर यापेक्षा मोठी आश्चर्याची गोष्ट नाही, असं संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.
सुशांतचा पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करून अहवाल देण्याची विनंती सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे केली होती. त्यानुसार एम्स रुग्णालयाने डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम नेमली होती. त्यानुसार या टीमने सर्व शक्यतांचा विचार करून रिपोर्टचा अभ्यास केला. या अभ्यासानंतर सादर केलेल्या अहवालात, बॉम्बे टॉक्सिक सायन्स लॅब तसंच एम्स टॉक्सिकोलोजी लॅबमध्ये केलेल्या तपासणीत सुशांतच्या शरीरात कोणतेही विषारी पदार्थ आढळून आले नाहीत. सुशांतच्या शरीरावर गळफासशिवाय इतर कोणत्याही जखमा नव्हत्या. गळ्यावर असलेला डाग हा गळफासामुळेच होता. तसंच शरीर आणि कपड्यांची कुठलीही ओढाताण झालेली दिसली नाही. त्यामुळे हे प्रकरण गळफास लावून आत्महत्या केल्याचच दिसून येत असल्याचं डाॅ. सुधीर गुप्ता यांनी नमूद केलं आहे.