महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खातं उघडलं आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेचे प्रमोद (राजू) पाटील यांनी विजय मिळवला आहे. प्रमोद पाटील यांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा ५ हजारांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला.
प्रमोद पाटील यांच्या रुपाने विधानसभेत मनसेचा एक आमदार गेला आहे. पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू होती. या मतदारसंघात मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला होता.
आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला होता. मात्र, राष्ट्रवादीने येथे उमेदवार न देता प्रमोद पाटील यांना पाठिंबा दिला. या मतदारसंघात शिवसेनेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचा फायदा मनसेचे उमेदवार पाटील यांना मिळाला.
हेही वाचा -
वरळीतून आदित्य ठाकरे ६७ हजार ६७२ मतांनी विजयी
महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव