Advertisement

म्हणून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय- हसन मुश्रीफ

लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे कळविलं आहे.

म्हणून ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय- हसन मुश्रीफ
SHARES

कोरोना संकटामुळे निवडणुका घेण्यावर आलेली मर्यादा, ७३ वी घटनादुरूस्ती आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय अशा सर्व परिस्थितीत कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातील योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकीय हेतू नसून लोकशाही मार्गाने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी योग्य कार्यक्षम व्यक्तीची नियुक्ती करावी हीच अपेक्षा आहे, असं राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना पत्राद्वारे कळविलं आहे. (rural development minister hasan mushrif clarifies over appointing administrator on maharashtra gram panchayat)

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर केल्या जाणाऱ्या प्रशासकाच्या नियुक्तीबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून काही प्रश्न उपस्थित केले होते. त्याअनुषंगाने हसन मुश्रीफ यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मुदतवाढ देता येत नाही

या पत्रात हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा ५ वर्षाचा कार्यकाळ संपत आला आहे. १९९२ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार ग्रामपंचायतीचा कालावधी ५ वर्षे निश्चित करण्यात आला आहे. २००५ साली कार्यकाल संपलेल्या १३ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना मुदतवाढ दिली होती. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने या गोष्टीला आक्षेप घेत ते रद्द केले होते. राज्यघटनेत तरतूद नसल्याचा निर्वाळा त्यावेळी निवडणूक आयोगाने दिला होता. त्यावेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक आयोगाचा निर्णय कायम केला होता. उच्च न्यायालयाने तर याच्याही पुढे जाऊन सांगितलं की मुदत संपलेल्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांना अशी मुदतवाढ देऊन त्यांना मागच्या दाराने आणता येणार नाही.

हेही वाचा - कोरोना हे तर सरकारचं नाटक, प्रकाश आंबेडकरांनी घेतली राज्यपालांची भेट

निवडणूक घेणं शक्य नाही

कोरोनाच्या संकटाच्या काळात निवडणूक आयोगाला निवडणूक घेणं शक्य नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने सरकारला कळविले की, डिसेंबर, २०२० पर्यंत आम्ही निवडणूका घेवू शकत नाही. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी नेमायचे झाल्यास विस्तार अधिकाऱ्यांची संख्या ही मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींपेक्षा अत्यल्प आहे. तसंच विस्तार अधिकारी हे कोरोना महामारीच्या उच्चाटनाच्या कामकाजात व्यस्त आहेत.

तरच प्रशासक

५ वर्षाच्या कालावधीत सरपंचावर अविश्वास ठराव येवून सर्वांनी राजीनामे दिले तर किंवा न्यायालयाने एखादी निवडणूक बेकायदेशीर ठरविली तर प्रशासक नियुक्तीची ग्रामपंचायत अधिनियमात तरतूद आहे. तसंच भ्रष्ट कारभार करून लोकशाहीविरोधी कामकाज केलं असं सरकारला वाटलं तर तिथं प्रशासक नेमण्याची अधिनियमात तरतूद आहे. परंतु ५ वर्षे कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूका होवू न शकल्यास काय करावं यासंबंधी अधिनियमात तरतूद अस्तित्वात नाही. त्यामुळे अधिनियमात शासनाने दुरूस्ती करून युद्ध, आणीबाणी, वित्तीय आणीबाणी, महामारी अशा परिस्थितीत निवडणूक घेता येणं शक्य नसल्यास योग्य व्यक्तीची नियुक्ती प्रशासक म्हणून शासनास करता येईल असा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडून वित्त विभागाकडे व त्यानंतर विधी व न्याय विभागाने तपासल्यानंतर मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांच्यामार्फत मंत्रिमंडळासमोर मान्यतेसाठी सादर केला होता. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर व राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर अध्यादेश निर्गमित करून कायद्यात दुरूस्ती झाली आहे, असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

पालकमंत्री शासनाचे प्रतिनिधी

राज्यातील एकूण १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर मुदत संपल्यानंतर प्रशासक नेमणुकीचे अधिकार शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देऊन पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने नेमणूक करावी अशा प्रकारे शासन निर्णय निर्गमित केला आहे. पालकमंत्री हे त्या जिल्ह्याचे शासनाचे प्रतिनिधी म्हणून कामकाज पाहत असतात व जिल्हास्तरीय विविध समित्यांवर सदस्य पालकमंत्र्यांद्वारेच नियुक्त केले जातात. पालकमंत्री त्या जिल्ह्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासनाचा भाग म्हणून कार्यरत असतात. जिल्ह्याच्या नियोजन मंडळाचेही ते अध्यक्ष असतात व जिल्ह्यात उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासन व शासन यामध्ये दुवा म्हणून काम करतात. पालकमंत्र्यांना मी पत्र लिहून ग्रामपंचायतीमधील सध्याच्या सरपंचाच्या आरक्षणनिहाय गावातील कार्यक्षम व चांगल्या व्यक्तीची नियुक्ती करावी, असं कळविलं आहे, असंही मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रात म्हटलं आहे.

एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये नियुक्तीवरून काही वाद झाल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नियुक्ती झाल्यास ती रद्द करण्याचा अधिकार ग्रामविकास विभागाला आहे. तसंच या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालय मुंबई, नागपूर व औरंगाबाद खंडपीठ इथं याचिका दाखल झाल्या आहेत. याबाबत उच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह आहे, असंही हसन मुश्रीफ यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हेही वाचा - पुढच्या निवडणुकाही एकत्रित लढू- शरद पवार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा