Advertisement

Bakra Eid: बकऱ्यांशिवाय कुर्बानी कशी द्यायची? अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ऑनलाइन खरेदी केलेले बकरे गाड्यांमधून आणताना पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे.

Bakra Eid: बकऱ्यांशिवाय कुर्बानी कशी द्यायची? अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना संसर्गामुळे राज्य सरकारने बकरी ईदच्या उत्सवावर काही निर्बंध घातले आहेत. कुर्बानीवर बंदी नसली तरी बकऱ्यांचा बाजार भरवण्यास मनाई करण्यात आली आहे. ऑनलाइन खरेदीची परवानगी दिली आहे. मात्र, ऑनलाइन खरेदी केलेले बकरे गाड्यांमधून आणताना पोलीस गुन्हे दाखल करत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे. त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. ज्या सरकारला आम्ही मदत केली, त्यांच्या गळ्यात हार घातले, तेच हार आज साप बनून आम्हाला चावत आहेत, अशी खंत अबू आझमी यांनी व्यक्त केली. 

यासंदर्भात बोलताना अबू आझमी म्हणाले, बकरी ईदच्या उत्सवाला अवघे काही दिवस उरलेत. परंतु लोकं खूप वैतागले आहेत. मुस्लिमांना बकऱ्याची कुर्बानी देण्याचा कुठलाही हक्क नाही आणि एकही बकरा शहरात येऊ देणार नाही, असं उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सांगितलं असतं, तर लोकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान नसतं झालं. त्यांचे बकरे मरू लागलेत. एका बाजूला सरकारने आॅनलाईन बकरे खरे करण्यास परवानगी दिली आहे. परंतु तेच बकरे वाहनांनी आणायला गेल्यास पोलीस मारहाण करत आहेत, गुन्हे दाखल करत आहे. शहरात बकऱ्यांचं मार्केट लागणार नसल्याने एखाद्याने नाशिकहून बकरे मागवले, तर एका व्यक्तीचे २ बकरे यानुसार १० व्यक्तींचे २० बकरे शहरात घेऊन यायला वाहन लागणार की नाही लागणार ,असा प्रश्न अबू आझमी यांनी ठाकरे सरकारला केला.

हेही वाचा - Bakra Eid: बकरी ईदसाठी सरकारने काढल्या मार्गदर्शक सूचना

गुजरातहून आणलेले हजारो बकरे रांगेत उभे आहेत, बकरे मरत असल्याने मोठं नुकसान होत आहे. यातून व्यापारी आत्महत्या करतील. शेतकरी आणि मुस्लिमांवर तुम्ही मोठा अन्याय केला आहे. कुर्बानीला कुठलीही मनाई नाही असं तुम्ही म्हणता, पण जनावराशिवाय कुर्बानी होईलच कशी? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारचे नियम पाळू, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू, मस्जिदींऐवजी घरातच नमाज पढू, अत्यंत कमी स्वरूपात कुर्बानी करू, असं आम्ही आश्वासन दिल्यावर कुर्बानीला कुठलीही मनाई नाही, घरात करा किंवा परिसरात, असं तुम्ही म्हणता, पण जनावरंच येऊ देत नाहीत. आठ मंत्री तुम्हाला येऊन भेटतात आणि तुम्ही काहीच भूमिका घेत नाहीत. बकरी ईदसाठी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी बकरे विकत घेतले, म्हणजे ते विकून मुलांची शाळेची फी भरता येईल, वडिलांचा उपचार करता येईल, परंतु तुम्ही या अपेक्षांवर पाणी फेरलं. पोलीस आयुक्त ज्या पद्धतीने कारवाई करत आहेत, त्यांना लोकांचे शाप लागतील, असं अबू आझमी म्हणाले.

मला रात्रंदिवस लोकांचे मदतीसाठी फोन येताहेत. जर सरकारने बकरे येऊ देण्याची परवानगी दिली असती आणि त्यांना आरएसएस किंवा बजरंग दलाकडून अडवलं असतं तर एकवेळ मी पुढं होऊन मदत केली असती. पण सरकारच बकरे येऊ देत नसल्यावर मी काही करू शकत नाही, अशा शब्दांत आझमी यांनी नाराजी व्यक्त केली. 

(samajwadi party leader abu azmi slams cm uddhav thackeray over bakra eid in maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा