Advertisement

संभाजी ब्रिगेडची 'ठाकरे'ला धमकी

आपल्या तडाखेबंद विधानांसोबतच भाषणांमुळेही कायम चर्चेत राहिलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला 'ठाकरे' हा सिनेमाही वादात सापडला आहे.

संभाजी ब्रिगेडची 'ठाकरे'ला धमकी
SHARES

आपल्या तडाखेबंद विधानांसोबतच भाषणांमुळेही कायम चर्चेत राहिलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला 'ठाकरे' हा सिनेमाही वादात सापडला आहे. सिनेमातील काही दृष्यांवर आक्षेप घेत संभाजी ब्रिगेडने 'ठाकरे' प्रदर्शित होऊ देणार नसल्याची भूमिका घेतल्याने महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


विरोध खपवून घेणार नाही

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला ‘ठाकरे’ हा चित्रपट येत्या २५ तारखेला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपुर्वी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लॉंच झालं तेव्हाच निर्माते आणि खासदार संजय राऊत यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध खपवून घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली होती. सेन्सॅारनेही या सिनेमातील काही शब्दांवर आक्षेप घेतला होता त्यांना प्रत्युत्तर देत राऊत यांनी वरील वक्तव्य केलं होतं.


संभाजी ब्रिगेडचा आक्षेप

आता संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतल्याने 'ठाकरे'समोर पेच निर्माण झाला आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेतील अभिनेता नवाजुद्दीन छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालत असल्याचं दृष्य दाखवण्यात आलं आहे. यावेळी त्याच्या पायात पांढऱ्या रंगाची चप्पल असल्याचं स्पष्टपणे दिसतं. पायातील चप्पल न काढता नवाजुद्दीनने छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्याच्या दृष्यावर संभाजी ब्रिगेडचा आक्षेप आहे.


आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी 'ठाकरे'मधील आक्षेपार्ह दृश्य वगळण्याची मागणी केली. हे दृश्य वगळलं गेलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही ढोके यांनी दिला आहे. या सिनेमातील पुष्पहाराचा प्रसंग संभाजी महाराजांचा अपमान करणारा आहे. बाळासाहेब ठाकरेंबाबत आमच्या मनात नितांत आदराची भावना आहे. त्यांच्यावर सिनेमा बनवण्याला आमची काहीच हरकत नाही, पण संभाजी राजांचा अपमान सहन केला जाणार नसल्याचंही ढोके म्हणाले. संभाजी ब्रिगेडच्या या भूमिकेनंतर निर्माता-दिग्दर्शकाने तातडीने निर्णय घेत ते दृष्य वगळलं नाही तर शुक्रवारी परिस्थिती बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

दरम्यान, 'ठाकरे' चित्रपटाच्या आड कोणीही येऊ शकत नाही असं शिवसेनेचे खासदार आणि चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यामुळं संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक कपिल ढोके यांनी केलेल्या मागणीनुसार राऊत हे दृष्य सिनेमातून वगळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

नवी कोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून रवाना

Movie Review : जीवनाचं सूत्र सांगणारा रहस्यपट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा