Advertisement

तर कोविड-बिविड काही बघणार नाही, संभाजीराजेंचं राज्य सरकारला अल्टिमेटम

तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी हा संभाजीराजे आघाडीवर असेल, असं अल्टिमेटम छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

तर कोविड-बिविड काही बघणार नाही, संभाजीराजेंचं राज्य सरकारला अल्टिमेटम
SHARES

येत्या ६ जूनपर्यंत मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रलंबित योजनांवर जर राज्य सरकारने योग्य ती कार्यवाही केली नाही आणि निश्चित असा प्लॅन ऑफ अॅक्शन ठरवला नाही, तर आम्ही कोविड-बिविड काहीही बघणार नाही, मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी हा संभाजीराजे आघाडीवर असेल, असं अल्टिमेटम छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसंदर्भात संभाजीराजे मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राचा दौरा करत मराठा समाजातील विधिज्ञ, जाणकार आणि लोकांच्या भेटीगाठी घेत होते. यानंतर संभाजीराजेंनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यावर मराठा आरक्षणाविषयी सर्व समाजाच्या भावना व्यक्त करण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला.   

यावेळी त्यांनी अगदी सडेतोड शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाविरोधात निकाल लागला तेव्हापासून मराठा समाज अत्यंत अस्वस्थ आहे. मात्र सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात गुंतले आहेत. मराठा समाजाला न्याय कोण मिळवून देणार? असा प्रश्न सर्वांच्या मनात धगधगतोय. परंतु मी स्वत: ५ मे रोजी निकाल लागला तेव्हा सगळ्यांना शांत ठेवलं. नाहीतर आतापर्यंत महाराष्ट्र पेटला असता. पण आम्ही किती काळ शांत बसायचं?, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला.

हेही वाचा- मराठा आरक्षणावर अधिवेशन बोलवण्याची सरकारमध्ये हिंमत नाही- चंद्रकांत पाटील

६ जूनची मुदत

६ जून हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा दिवस आहे. याच दिवशी शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराजांनी अडचणीत असलेल्या आपल्या मावळ्यांना असं टाकलं असतं का? तेव्हा मुख्यमंत्र्यांना मला आज स्पष्ट सांगायचं आहे. मराठा आरक्षणावर सरकारकडून आम्हाला ठोस उपाय हवा आहे. समाजाच्या हक्काच्या योजनांवर प्रत्यक्ष कार्यवाही हवी आहे. ६ जूनआधी आम्हाला बोलावून निश्चित असा काही कार्यक्रम तुम्ही दिला नाही, तर आमची आंदोलनाची भूमिका रायगडावरून जाहीर करू.  नंतर मी कोविड-बिविड बघणार नाही. हा संभाजीराजे तिथं आघाडीवर असेल.

लोकप्रतिनिधींवर जबाबदारी

सध्याच्या परिस्थितीत आम्हाला समाजाला वेठीला धरायचं नाही. लोकांना रस्त्यावर घेऊन उतरायचं नाहीय. म्हणूनच ६ जूनला समाजातील लोकांना नाही, तर सगळ्या आमदार-खासदारांना घेऊन रस्त्यावर उतरू. कारण आता ही जबाबदारी लोकांची नाही, तर या सगळ्या खासदार, आमदार, मंत्र्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे राज्यसभा, लोकसभा, विधानसभा, विधानपरिषद इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी या आंदोलनात सहभागी व्हायला हवं, अन्यथा मराठा समाजाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

हेही वाचा- मराठा तरूणांच्या नियुक्त्या का थांबवल्या, संभाजीराजेंच्या मुख्यमंत्र्यांना सवाल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा