Advertisement

'सेल्फीश' राजकारण


SHARES

दादर - आबालवृद्धांच्या लाडक्या शिवाजी पार्कात सध्या राजकीय बॅनर्सनी धम्माल उडवून दिली आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला ‘सेल्फी पॉइंट’ स्थानिक राजकारणाचा आरसा ठरतोय. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत देशपांडे यांची पत्नी स्वप्ना देशपांडे यांच्या वॉर्ड क्रमांक 191 मधून झालेल्या पराभवाने व्यथित होऊन संदीप देशपांडे यांनी ‘सेल्फी पॉइंट’ बंद करण्याचा निर्णय घेतला. सीएसआर फंड मिळत नसल्याने आपण ‘सेल्फी पॉइंट’ बंद करण्याचा कटू निर्णय घेत असल्याचं ‘मुंबई लाइव्ह’ ला सांगणा-या संदीप देशपांडे यांच्या चेह-यावरची उद्विग्नता लपली नाही.

मनसेच्या अडचणीमध्ये भाजपाला संधी दिसली नसती तरच नवल. शिवाजी पार्क परिसरातल्या ‘सेल्फी पॉइंट’बद्दलचं आबालवृद्धांमधलं आकर्षण लक्षात घेऊन भाजपा लवकरच सेल्फी पॉइंट अधिक आकर्षक स्वरुपात सुरु करणार असल्याची घोषणा मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी ट्विटर मार्फत करुन टाकली. मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर वॉर्डातल्या जनतेसमोर येण्यासाठी हा विषय उत्तम आहे, हे मूळच्या शिक्षिका असलेल्या माजी महापौर, माजी आमदार आणि नवनिर्वाचित नगरसेविका विशाखा राऊत यांनी ओळखलं. परिणामी शिवाजी पार्कात पुन्हा ‘सेल्फी पॉइंट’ सुरु होणार असल्याचे बॅनर्स पार्क परिसरात झळकले. एव्हाना आपली झालेली चूक संदीप देशपांडे यांनाही उमगली आणि त्यांनी आपल्या भूमिकेपासून ‘यु टर्न’ घेत सेल्फी पॉइंट आमचंच... चा ‘बॅनर’नारा दिला. संदर्भ अर्थातच राज ठाकरे यांच्या आदेशाचा. गंमत म्हणजे या सर्व ‘सेल्फीश’ राजकारणात बाजी मारली ती भाजपानेच. ‘सेल्फी पॉइंट’ नव्याने उभं करण्यासंदर्भात वॉर्ड ऑफीसमध्ये विनंतीपत्र धाडून त्या पत्राला पोच मिळवण्याचा कारनामा भाजपाने करुन दाखवला. भाजपाच्या या खेळीमुळे सेल्फी पॉइंटच्या मुद्द्यावरुन सुरु झालेल्या राजकीय संघर्षाला वॉर्ड ऑफीसमधून पोचपावतीचा ‘अधिकृत’ आधार मिळाला.

पण हा संघर्ष संपला नसल्याचं मनसे सांगू पाहतेय. संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यात कुणीही नाक खुपसण्याचं कारण नसल्याचं ट्विट करत ‘सेल्फी पॉइंट’ च्या लढाईतली आपली विजयाची दावेदारी संपली नसल्याचं दाखवून दिलं आहे. शिवसेना, भाजपा आणि मनसेने हा विषय प्रतिष्ठेचा बनवल्यामुळे सर्वसामान्यांना सेल्फीश राजकारणाचा आरसा स्वतःच्याच चेह-यासमोर नाचवणारे राजकारणी मात्र पहायला मिळाले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा