दादर, माहिममध्ये शिवसेनेचा दणदणीत विजय


SHARE

दादर - कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा अनेक घोषणांनी दादर परिसर दणाणून गेला होता. गतवेळीच्या निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये मनसेचे नगरसेवक निवडून आल्यामुळे पुन्हा एकदा दादरकर मनसेला संधी देतील का अशी शंका होती. पण, या वेळी मनसेचा दादर विभागात पराभव झाल्याचं चित्र पहायला मिळालं.

दादर माहिममध्ये माजी महापौरांना जनतेने विशेष कौल दिल्याचे या वेळी दिसून आले. वॉर्ड 182 ला शिवसेनेचे माजी महापौर मिलींद वैद्य तर वॉर्ड क्रमांक 191 मधून माजी महापौर विशाखा राऊत यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. जी उत्तर विभागात 11 जागांमध्ये 7 जागांवर शिवसेना विजयी झाली असून 1 जागा भाजपा आणि 1 जागा मनसेने मिळवली आहे. तर काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

वॉर्ड क्रमांक 191 साठी दादर माहिम विभागातून तगडी चुरस असल्यामुळे मनसेकडून गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे, शिवसेनेकडून माजी महापौर विशाखा राऊत, भाजपाकडून वसंतराव जाधव यांच्या कन्या डॉ. तेजस्विनी जाधव अशी तगडी लढत असल्यामुळे या निकालाकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले होते.

निवडणुकीचा निकाल लागताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. 11 पैकी 7 जागांवर विजय मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये विशेष उत्साह पहायला मिळाला. तसंच या विजयाला विशेष रंगत आली ती दोन माजी महापौरांच्या दणदणीत विजयामुळे. भाजपाला वॉर्ड क्रमांक 190 शितल गंभीर यांच्या रुपात केवळ एक जागा मिळाली असली तरीही डिसिल्वा हायस्कूल समोर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या