शिवसेनेकडून भाजपाची ‘पारदर्शक कोंडी’

  Malabar Hill
  शिवसेनेकडून भाजपाची ‘पारदर्शक कोंडी’
  मुंबई  -  

  मलबार हिल - पारदर्शकतेच्या मुद्द्यावर भाजपाला जेरीस आणण्याचे प्रयत्न आता शिवसेनेने सुरू केले आहेत. शुक्रवारी सकाळी सर्व मंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कळविण्यात आले. नेहमी सह्याद्री शासकीयगृहात किंवा मंत्रालयात होणारी बैठक शुक्रवारी अचानक वर्षा बंगल्यावर घेतली गेली. महापालिकेच्या निवडणुका आणि निकाल लागल्यानंतर पहिल्यांदा भाजपा-शिवसेनेचे मंत्री एकमेकांच्या समोर आले होते. 

  भाजपाने मुंबई महापालिका निवडणूक प्रचारामध्ये पारदर्शकतेच्या मुद्या घेऊन शिवसेनेला सळो की पळो करून सोडले होते. आता हाच पारदर्शकता मुद्दा भाजपाला डोईजड झाला आहे. कारण शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकार, विरोधी पक्ष नेते, लोकायुक्त यांना हजर राहण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली. या मागणीचा रेटा बैठकीमध्ये शिवसेनाच्या मंत्र्यानी लावताच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर भाजपाच्या मंत्र्यांसोबत मुख्य सचिव सुमीत मलिकही मुख्यमंत्रीची बाजू सावरण्यासाठी पुढे आले. कायद्यानुसार हे सध्या अशक्य आहे, असे सुधीर मुनगंटीवार यांचे म्हणणे होते. तर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की कायद्यामध्ये तरतूद करता येऊ शकते आणि पारदर्शकता या मुद्द्यावर भाजपा गंभीर असेल तर त्यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

  शिवसेनेच्या एका जेष्ठ नेत्याने सांगितले की जर महाराष्ट्रातील माहिती अधिकारसारखे कित्येक कायदे देशाने स्वीकारले आहेत. तर पारदर्शकतेवर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि देशासमोर पारदर्शक आर्दश ठेवावा, अशी आक्रमक मागणी शिवसेनेच्या मंत्र्यानी लावून धरली. महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील प्रचारात भाजपा-शिवसेनेने एकमेकांविरोधात झोंबणारी टीका केली होती. त्यातही भाजपाच्या नेत्यांनी थेट मातोश्रीवर भष्ट्चाराचा आरोप केला होता. 6 मार्चला सुरू होणाऱ्या अधिवेशनामध्ये भाजपाला काँग्रेस-राष्ट्रवादी या विरोधी पक्षांसोबतच आता शिवसेनेच्या विरोधाला तोंड द्यावे लागणार आहे. नोटांबंदीमुळे उद्योग-शेतकऱ्यांना झालेले नुकसान, शेतकरी कर्जमाफी, मुंबईतील विकास योजना, मुंबईतील हरित पट्टे, विदर्भ, नागपूर महापालिकेची माहिती नाकारल्यामुळे अनिल परब यांनी हक्कभंग आणण्याचा दिलेला इशारा यावरून शिवसेना भाजपाला एकटे पाडण्याचे मनसुबे रचत आहे. त्यामुळे भाजपाला नामोहरम करण्याची खेळी शिवसेनासहित काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष रचत आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.