घोषणां'शिव्या' आहेच काय?

 Dadar
घोषणां'शिव्या' आहेच काय?
Dadar , Mumbai  -  

दादर - परिसर दणाणून सोडणाऱ्या घोषणा आणि शिवसेना यांच्यातलं नातं तसं जुनं. शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासूनचं. पक्षाने सुवर्णमहोत्सवी पल्ला ओलांडला, शिवसेनेनं काळानुरुप काही बदल केले, बदललं नाही ते बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि गगनभेदी घोषणाबाजी यांचं नातं. शिवसेनेनं पन्नाशी ओलांडली पण पक्षाच्या ‘ट्रेडमार्क’ घोषणांनी वार्धक्याची झूल पांघरलेली नाही, हे मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालांच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शिवसेनाभवन, तसंच लालबाग, परळ, परिसर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांमध्ये जुन्या-नव्या घोषणांची सरमिसळ ऐकायला मिळाली.

अरे जिंकून जिंकून जिंकणार कोण? शिवसेनेशिवाय आहेच कोण?

कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला…

या चिरपरिचीत घोषणांचे बाण आजही भात्यातून बाहेर येत राहिले.
विरोधकांवर बरसतानाही शिवसेना स्टाइल क्रिएटीव्हीटी दिसलीच.

बघताय काय रागाने, बाजी मारलंय वाघाने,

मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाची बापाची

या घोषणांच्या माध्यमातून शिवसेनेच्या वाघानं भाजपाच्या सिंहाला बोचकारण्याची संधी साधली.

राज ठाकरे यांची मनसेसुद्धा शिवसेनेच्या घोषणा तडाख्यातून सुटली नाही.
राजाला लाथ दिली, भाजपाला केला XXX, पालिकेवर फडकणार शिवसेनेचा भगवा

आदी घोषणांमधून राजाला साथ द्या या गाण्याची टर उडवत भाजपाला औकात दाखवण्याचा प्रयत्न शिवसैनिक करताना दिसले.

बंडखोर म्हणजे शिवसेनेच्या भाषेत गद्दारांचा उद्धार करताना नीम का पत्ता कडवा हैं… अमुक तमुक XXX हैं

फुल्याफुल्यांच्या शिव्या शिवसेनेला कधीही वर्ज्य नव्हत्या. किंबहुना हेच शिवसेनेचं शक्तिस्थळ ठरत आलंय. जिभ आवरण्याच्या फंदात न पडता आपल्या बलस्थानाचा मुक्तकंठाने वापर करत शिवराळ घोषणांची परंपरा शिवसेनेने इमानेइतबारे राखली.

Loading Comments