Advertisement

शिवसेनेचं वचन, देणार १० रुपयांत जेवण, १ रुपयांत आरोग्य सेवा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते.

शिवसेनेचं वचन, देणार १० रुपयांत जेवण, १ रुपयांत आरोग्य सेवा
SHARES

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेनेचा ‘वचननामा’ जाहीर करण्यात आला. यावेळी आदित्य ठाकरे आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. या वचननाम्यात महाराष्ट्रातील जनतेला १० रुपयांत सकस अन्न आणि १ रुपयांत प्राथमिक आरोग्य चाचणीचं प्रमुख वचन देण्यात आलं आहे. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना “वचननाम्यातील वचनं विचार करून देण्यात आली आहे. शिवसेना जे बोलते ते करते. राज्याच्या तिजोरीवर किती भार पडेल याचा विचार करूनच हा वचननामा तयार करण्यात आला आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

'अशा' मिळतील सुविधा

१० रूपयांमध्ये सकस अन्न कसं उपलब्ध करून देणार? या प्रश्नाचं उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, यासाठी आम्ही महिला बचतगटांची मदत घेणार आहोत. तसंच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या आम्ही  एका रुपयांत उपलब्ध करून देणार आहोत. दुर्बल घटकातील शेतकऱ्याला प्रतिवर्ष १० हजार रुपये, यातील एकही वचन खोटं ठरणार नाही. कारण राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच आम्ही हा वचननामा बनवला आहे,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. 

लोकांशी चर्चा करून

“ मागील ५ वर्षांमध्ये तसंच जन आशीर्वाद यात्रेदरम्यान लोकांशी चर्चा करून, त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांच्या इच्छा-आकांक्षेचं संकलन करून हा वचननामा बनवलेला आहे,” असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.

आरेचा उल्लेख नाही

उपस्थित पत्रकारांनी ‘आरे’चा उल्लेख वचननाम्यात का नाही? असा प्रश्न विचारला असता, 'आरे'चा विषय मुंबईकरांसह सर्वपक्षांशी संबंधित आहे. शिवसेनेने 'आरे'तील मेट्रो कारशेडसाठी होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे आणि तो पुढंही राहणारच. परंतु, एकट्या शिवसेनेला जबाबदार धरण्याऐवजी सर्वपक्षांना विचारा. मग शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह इतर पक्षाच्या नेत्यांना उभं करा आणि एकदा आरेवर चर्चा घडवा. आमची तयारी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेच्या वचनाम्यातील वैशिष्ट्ये:

  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी मंत्री दर्जाचं विशेष खातं.
  • ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे घरगुती वीज दर ३० टक्क्यांनी कमी करणार.
  • आर्थिक दुर्बल घटकातील मुलींचं शिक्षण मोफत करणार.
  • राज्यातील १५ लाख पदवीधर युवकांना ‘युवा सरकार फेलो’मार्फत शिष्यवृत्ती
  • रोजगाराभिमूख शिक्षण देणारी व्यवस्था निर्माण करणार.
  • अल्पभूधारक आणि आर्थिक दुर्बल घटकातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्षाला १० हजार जमा करणार.
  • तालुका स्तरावर गाव ते शाळा प्रवासासाठी विद्यार्थी एक्स्प्रेसची सुरूवात करणार.
  • प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिक व शारीरिक तपासणी करणार.
  • नगरपरिषदा, नगरपालिके, महानगरपालिकेत रस्त्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद.
  • ज्या ठिकाणी बससेवा नाही त्या ठिकाणी मुंबईप्रमाणे बससेवेची सुरूवात करणार.
  • सर्व राज्यांमध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल उभारणार.
  •  ‘शिव आरोग्य योजने’अंतर्गत वन रूपी क्लिनिक सुरू करणार.
  • राज्यात १ हजार ठिकाणी स्वस्त आणि सकस जेवण केंद्र स्थापणार.
  • सरकारी नोकरीतील सर्व रिक्त पदं भरणार.
  • ‘मुख्यमंत्री आवास योजने’अंतर्गत राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वत:चं घर देणार.


 


हेही वाचा -

शिवसेना-भाजपचा वेगवेगळा जाहीरनामा, ‘या’ तारखेला होणार प्रसिद्ध

मला सत्ता नको, प्रबळ विरोधी पक्ष बनवा- राज ठाकरे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा