Advertisement

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे.

रेल्वे खातं मागणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला अवजड उद्योग, सावंत झाले नाराज
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप शुक्रवारी करण्यात आलं. यामध्ये रेल्वे मंत्रालयाची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला पुन्हा दुय्यम दर्जाचं अवजड मंत्रालय आलं आहे. त्यामुळे शिवसेना नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आम्ही नाराज नसल्याचं म्हटलं आहे. हे खातं दुय्यम नाही. देश पुढे नेण्यासाठी सर्वच खाती महत्त्वाची आहेत. अवजड उद्योगासाठी स्वतंत्र खातं आहे. मग हे खातं दुय्यम कसं? असा प्रतिप्रश्नही राऊत यांनी केला.


रेल्वे, उर्जाची अपेक्षा

नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातून ७ जणांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल व शिवसेनेचे अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. तर राज्यमंत्रिपदी खासदार रावसाहेब दानवे, रामदास आठवले व संजय धोत्रे यांची वर्णी लागली आहे. या खातेवाटपात शिवसेनेची मात्र निराशा झाली आहे. नव्या मंत्रीमंडळात रेल्वे, उर्जा, उद्योग आदी खात्यांपैकी एक खातं मिळण्याची शिवसेनेला अपेक्षा होती. मात्र, पुन्हा एकदा अवजड उद्योग हे दुय्यम खातं शिवसेनेला मिळालं. मागील मंत्रीमंडळात शिवसेनेचे अनंत गिते यांच्याकडे अवजड मंत्रालयाचाच कारभार होता. 


मोदींवर विश्वास

संजय राऊत यांनी मात्र कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असल्याने आम्ही सत्तेत सहभागी झालो आहेत. पंतप्रधानांना देश घडवायचा आहे. सर्वात जास्त रोजगार अवजड उद्योग खात्यात आहे. देशासाठी कोणतंही खात मिळालं तरी ते चांगलं असल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी दिली. 


महाराष्ट्राच्या वाट्याला काय?

नितीन गडकरी यांच्याकडील केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते विकास व परिवहन तर पीयूष गोयल यांच्याकडं रेल्वे खातं कायम ठेवण्यात आलं आहे.  प्रकाश जावडेकर यांच्याकडे माहिती व प्रसारण खातं,  शिवसेनेचे अरविंद सावंत यांच्याकडं अवजड उद्योग खातं देण्यात आलं आहे. आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सामाजिक न्याय, रावसाहेब दानवे यांना ग्राहक संरक्षण, संजय धोत्रे यांना मनुष्यबळ विकास या खात्यांच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.



हेही वाचा  -

माेदी मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री, तर सीतारमण अर्थमंत्री

शिवसेनेला हवं रेल्वे मंत्रालय?, राज्यातील 'या' खासदारांना मिळणार मंत्रीपद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा