Advertisement

माेदी मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री, तर सीतारमण अर्थमंत्री

शुक्रवारी दुपारी मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खाते वाटपानुसार अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली असून निर्मला सीतारमण यांना बढती देऊन त्यांच्याकडे अर्थमंत्रालय देण्यात आलं आहे.

माेदी मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री, तर सीतारमण अर्थमंत्री
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ५७ खासदारांनी गुरूवारी संध्याकाळी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मोदी यांच्या मंत्रिमंडळात कुठल्या मंत्र्याला कुठलं खातं मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. खासकरून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना कुठलं खातं देण्यात येईल, याकडेही सर्वांच्या नजरा होत्या. गुरूवारी उशीरापर्यंत याबाबतचा सस्पेन्स कायम होता. त्यानुसार शुक्रवारी दुपारी मोदी मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं. या खाते वाटपानुसार अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली असून निर्मला सीतारमण यांना बढती देऊन त्यांच्याकडे अर्थमंत्रालय देण्यात आलं आहे. 

सीतारमण यांना बढती

माजी अर्थमंत्री अरूण जेटली यांनी तब्येतीच्या कारणाने मंत्रीमंडळात सामील होण्यास पंतप्रधान मोदी यांना नकार कळवला होता. त्यामुळे संरक्षण खात्याची महत्त्वाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या सीतारमण यांच्यावर मोदी यांनी अर्थ खातं सोपवत विश्वास दर्शवला आहे. सीतारमण यांचं संरक्षण मंत्रालय राजनाथ सिंह यांच्याकडे देण्यात आलं आहे.

गडकरींचं खातं कायम

तर, शहा यांच्याकडे गृहमंत्रालय आल्याने ते आपल्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा लवकरच देतील असं म्हटलं जात आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यावर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. उत्तम परफाॅर्मन्समुळे नितीन गडकरी यांच्याकडे जुनंच दळणवळण मंत्रालय आणि पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय ठेवण्यात आलं आहे.

रवीशंकर प्रसाद यांना कायदा मंत्री करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांना अमेठीत पराभवाचं पाणी पाजणाऱ्या स्मृती इराणी यांना महिला आणि बालविकास मंत्रालय देण्यात आलं आहे. तर नरेंद्र तोमर यांना कृषीमंत्री करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री, ९ राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आणि २४ राज्यमंत्री असतील. नव्या मंत्रीमंडळात मोदींनी अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.


 हेही वाचा-

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ

राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन, ही तर अफवा- शरद पवार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा