Advertisement

शिवसेनेत 'मी कंटाळलो' हा राणेंचा जावईशोध!- एकनाथ शिंदे

मी नाराज असल्याचा जावईशोध नारायण राणेंनी कुठून लावला माहीत नाही. त्याऐवजी राणेंनी काढलेल्या यात्रेत ‘जन आशीर्वाद’ कसा मिळेल याची काळजी त्यांनी घ्यावी.

शिवसेनेत 'मी कंटाळलो' हा राणेंचा जावईशोध!- एकनाथ शिंदे
SHARES

केवळ पक्षातच नव्हे, तर नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करताना मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यामुळेच मी आतापर्यंत लोकहिताचे अनेक प्रकल्प राबवू शकलो. मी नाराज असल्याचा जावईशोध नारायण राणेंनी कुठून लावला माहीत नाही. त्याऐवजी राणेंनी काढलेल्या यात्रेत ‘जन आशीर्वाद’ कसा मिळेल याची काळजी त्यांनी घ्यावी, अशा शब्दांत शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर नगरविकास मंत्री म्हणून जबाबदारी सोपविल्यापासून आजपर्यंत कधीही माझ्या कामात हस्तक्षेप केलेला नाही. त्यांच्याच पाठबळामुळे नगरविकास विभागात अनेक चांगले निर्णय घेता आले. अनेक लोकहिताचे प्रकल्प राबवता येत आहेत. समृद्धी महामार्ग यशस्वीपणे पुढं नेतोय. 

नारायण राणे हे स्वत: मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यामुळे कोणत्याही खात्याचा धोरणात्मक निर्णय जो राज्याच्या दृष्टीने महत्वाचा असतो तो मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंजूर होत नाही. माझ्याच नव्हे तर कोणत्याही विभागाचे धोरणात्मक निर्णय हे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा होऊनच घेतले जातात व ते योग्यच आहे. ते स्वत: आता केंद्रीय मंत्री असून त्यांच्या खात्याचे धोरणात्मक निर्णय हे पंतप्रधानांच्या संमतीशिवाय नक्कीच मंजूर होत नसावेत. त्यामुळं त्यांचं वक्तव्य हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून हे संभ्रम पसरवण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचं उत्तम काम सुरू आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असा चिमटाही एकनाथ शिंदे यांनी काढला. 

हेही वाचा- मी प्रबोधनकारही वाचलेत आणि यशवंतराव चव्हाणही, राज ठाकरेंचं पवारांना प्रत्युत्तर

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना भक्कम असून त्याला खिंडार पाडण्याचे उद्योग भाजपकडून वेळोवेळी करण्यात आले आहेत. हा प्रकार सुद्धा त्यातलाच एक आहे. शिवसेनेने मला कायम भरभरून दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं. उद्धव ठाकरे यांनी अपार विश्वास दाखवला. मला माझ्या पक्षात काम करण्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे. मग मी कंटाळण्याचा प्रश्नच कुठं येतो. मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणं एवढेच मला माहीत आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणं हे माझ्या रक्तात नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

‘जन आशीर्वाद’ यात्रेदरम्यान वसई इथं बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरते उरले असून त्यांच्या सर्व फायली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात. शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील, असं सूचक विधान केलं होतं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा