भावी महापौर अडकणार कायद्याच्या कचाट्यात?

  CST
  भावी महापौर अडकणार कायद्याच्या कचाट्यात?
  मुंबई  -  

  मुंबई - मुंबईत मोठ्या राजकीय हेवेदावे आणि आकडेमोडीनंतर शिवसेनेचे विश्वनाथ महाडेश्वर यांच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झाला. मात्र आता महाडेश्वर यांचं महापौरपदच नव्हे तर त्याचंं नगरसेवकपदही अडचणीत येण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 87 मधले काँग्रेसचे उमेदवार अॅड. धर्मेश व्यास यांनी महाडेश्वर यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली आहे.

  चुकीचे प्रतिज्ञापत्र सादर करणे, अवैध उमेदवारी अर्ज दाखल करून घेणे, महाराष्ट्र खासगी शाळा कायद्याचं उल्लंघन, वोटिंग मशीनमध्ये फेरफार करणे असे प्रकार घडल्याचा दावा या याचिकेमध्ये करण्यात आला आहे. शिवसेनेचे विजयी उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर, माजी नगरसेवक कृष्णा पारकर आणि इतर उमेदवारांवर व्यास यांनी हे आरोप केले आहेत. यासंदर्भात प्रभाग क्रमांक 87 च्या निवडणुकीचा निकाल रद्दबातल ठरवण्यात यावा अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. दिवाणी सत्र न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 एप्रिल 2017 रोजी निश्चित केली आहे.

  याचिकेत करण्यात आलेले दावे -

  • विश्वनाथ महाडेश्वर हे निवडणूक लढवण्यासाठी पात्र नव्हते
  • प्रतिज्ञापत्र सादर करताना महाडेश्वर यांनी चुकीची माहिती सादर केली
  • चुकीच्या माहितीमुळे महाडेश्वर हे एमएमसीच्या (मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन) कलम 16 नुसार अपात्र ठरतात. तसेच एमएमसीच्या कलम 28फ आणि 28 ग नुसार ते दोषी ठरतात
  • नियमानुसार निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी सरकारी शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा राजीनामा देणं बंधनकारक आहे. मात्र त्यांनी तो दिला नाही
  • निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवणारे कृष्णा उर्फ महेश पारकर यांनीही उमेदवारी अर्ज भरताना त्यांची संपत्ती आणि जातीबद्दल चुकीची माहिती दिली

  या सर्व दाव्यांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 87 मधील निवडणूक निकाल रद्द ठरवून आपल्याला विजयी म्हणून घोषित करण्याची मागणीही धर्मेश व्यास यांनी केली आहे. आता या खटल्यात विश्वनाथ महाडेश्वर दोषी आढळले, तर मुंबईत पुन्हा एकदा महापौरपदाच्या निमित्ताने राजकीय कुरघोडी पहायला मिळू शकते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.