Advertisement

शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स, सरनाईकांचा विरोधकांना टोला

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या विरोधकांना सुनावलं आहे.

शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स, सरनाईकांचा विरोधकांना टोला
SHARES

शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे. जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात, अशा शब्दांत शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी ट्विट करत मुंबई पोलिसांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या विरोधकांना सुनावलं आहे. (shiv sena mla pratap sarnaik slams bjp on fake media accounts to defamation mumbai police in ssr case)

बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातील तपासावरून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना विरोधकांकडून सातत्याने लक्ष्य करण्यात येत होतं. अनेक नेत्यांकडून शंकाकुशंका काढल्या जात होत्या, तर्क वितर्क लढवले जात होते. यामुळे केवळ राजकीय नेतेच नव्हे, तर वृत्तवाहिन्यांकडून देखील परस्पर मीडिया ट्रायल चालवल्या जात होत्या. यामुळे सर्वसामान्य जनतेत सरकार आणि पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचं म्हटलं जात आहे.

हेही वाचा - सुशांत सिंह प्रकरणाला अवास्तव प्रसिद्धी, अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवाल

विरोधकांकडून हे सर्व जाणीवपूर्वक कारस्थान रचण्यात आलं. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाने तसा अहवाल तयार केल्याचा दाखला देखील राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला. तर सुशांत प्रकरणी सरकार आणि मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार बनावट खाती तयार करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. सायबर सेलनं यासंदर्भात एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात सुशांतची आत्महत्या व मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकारची बदनामी करणाऱ्या पोस्टचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही याला दुजारो दिला आहे.

तर दुसऱ्या बाजूला एम्सच्या डाॅक्टरांनी केलेल्या तपासात सुशांतच्या शरीरात एकही विषारी कण आढळलेला नाही. त्यामुळे हे प्रकरण हत्येचं नाही, तर आत्महत्येचच असल्याचं नमूद केलं आहे. यामुळे सुशांतप्रकरणी काही महिन्यांपूर्वी बॅकफूटला गेलेली शिवसेना आता पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.याच मुद्यावरून शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

ज्या महाराष्ट्रात तुम्ही राहता त्या महाराष्ट्र भूमीची सुरक्षा घेणाऱ्या मुंबई पोलिसांची खोटी बदनामी करायला तुम्हाला ८० हजार फेक अकाउंट्स तयार करावे लागतात. पण शिवसेनेकडे कट्टर निस्वार्थी अकाउंट्स आहेत, महाराष्ट्र व मुंबईची जनता आहे जे तुमचा बाजार एकाच दिवसात उठवतात, असं ट्विट प्रताप सरनाईक यांनी केलं आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा