Advertisement

'ब्रँड' राज ठाकरेंना राऊतांची साद

राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे.

'ब्रँड' राज ठाकरेंना राऊतांची साद
SHARES

‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. (shiv sena mp sanjay raut appeals mns chief raj thackeray on mumbai pok kangana ranaut issue)

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनात लिहिलेल्या लेखात भूमिका मांडताना संजय राऊत म्हणाले, मुंबईस पाकिस्तान व महापालिकेस बाबराची सेना असे बोलणाऱ्यांच्या मागे महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्ष उभा राहतो हे विचित्र आहे. पण सुशांत आणि कंगनास पाठिंबा देऊन त्यांना बिहारच्या निवडणुका जिंकायच्या आहेत. बिहारातील उच्चवर्णीय रजपूत, क्षत्रिय मते मिळविण्यासाठी हा खटाटोप आहे. त्यासाठी महाराष्ट्राचा अवमान झाला तरी चालेल. हे धोरण ‘राष्ट्रीय’ म्हणवून घेणाऱ्यांना शोभणारं नाही. महाराष्ट्राचा अवमान केला म्हणून दिल्लीतील एकाही मराठी केंद्रीय मंत्र्यास वाईट वाटले नाही तिथं संतापून राजीनामा वगैरे देण्याची बातच सोडा.

‘ठाकरे’ हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रॅण्ड आहे. दुसरा महत्त्वाचा ‘ब्रॅण्ड’ पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रॅण्डनाच नष्ट करायचं व त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा उघडं पडलं आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व या सगळ्याचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचं पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचं पतन व्हायला सुरुवात होईल.

हेही वाचा- समाजात तणाव निर्माण होऊ न देणं हे विरोधकांचही कर्तव्य- संजय राऊत

एक नटी मुंबईत बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध एकेरी भाषेत बोलते. आव्हानाची भाषा करते व त्यावर महाराष्ट्राच्या जनतेने काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही हे कसले एकतर्फी स्वातंत्र्य? तिच्या बेकायदेशीर बांधकामावर हातोडा पडला तेव्हा हे तर माझे राममंदिरच होतं, असा कांगावा तिने केला. पण हे बेकायदेशीर बांधकाम तिने कायद्याचे उल्लंघन करून ती सांगत असलेल्या ‘पाकिस्ताना’त बांधलं. मुंबईला पाकिस्तान बोलायचं व या ‘पाकिस्ताना’तल्या बेकायदेशीर कामांवर सर्जिकल स्ट्राईक केला की छाती पिटायची, हा कसला खेळ? संपूर्ण नव्हे, निदान अर्ध्या हिंदी सिनेसृष्टीने तरी मुंबईच्या अवमानासंदर्भात व्यक्त व्हायलाच हवं होतं. 

कंगनाचं मत हे संपूर्ण सिनेसृष्टीचं मत नाही, असं सांगायला हवं होतं. निदान अक्षय कुमार वगैरे मोठ्या कलावंतांनी तरी समोर यायला हवं होतं. मुंबईने त्यांनाही दिलंच आहे. मुंबईने प्रत्येकाला दिलं आहे. पण मुंबईबाबत कृतज्ञता व्यक्त करताना अनेकांना यातना होतात. जगभरातील श्रीमंतांची घरे मुंबईत आहेत. मुंबईचा अवमान होत असताना ते सगळेच खाली मान घालून बसतात. मुंबईचं महत्त्व फक्त ओरबाडण्यासाठी व पैसे कमवण्यासाठीच आहे. मग मुंबईवर कोणी रोज बलात्कार केला तरी चालेल. या सगळ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे, ‘ठाकरे’ यांच्या हाती महाराष्ट्राची सूत्रे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून मराठी अस्मितेसाठी राडे करण्याची आज गरज नाही. महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचं भाग्यचक्र मुंबईभोवतीच फिरत आहे. मुंबई देशाची असेल नाहीतर जगाची, पण तिच्यावर पहिला हक्क महाराष्ट्राचा आहे. जेव्हा जेव्हा मुंबईला डिवचलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राने प्रतिकार केला. यात काही चुकत असेल तर पंतप्रधान मोदी यांनीच सांगावे!, असं म्हणत पंतप्रधानांना देखील प्रश्न विचारला आहे.

हेही वाचा- कंगनाच्या चाहत्याकडून संजय राऊत यांना धमकी, कोलकत्यातून एकाला अटक


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा