Advertisement

...म्हणून संजय राठोड समोर येत नाहीत- संजय राऊत

संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येऊन दबाव आणतात, तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप केले जातील.

...म्हणून संजय राठोड समोर येत नाहीत- संजय राऊत
SHARES

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड (sanjay rathod) यांच्यावर आरोप होत असतानाही ते मागील आठवडाभरापासून माध्यमांसमोर आलेले नाहीत. यावरून विरोधकांकडून सरकारवर दबाव टाकण्यात येत असताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पहिल्यांदाच या प्रकरणावर भाष्य करत ते समोर न येण्यामागचं कारण सांगितलं आहे.

या प्रकरणावर बोलताना संजय राऊत म्हणाले, संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर का यावं? सध्या पोलिसांकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यातच ते प्रसारमाध्यमांसमोर आल्यास पुन्हा संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर येऊन दबाव आणतात, तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे आरोप केले जातील. त्यामुळे संजय राठोड शांत बसून आहेत, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी यावेळी सांगितलं.

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त देखील प्रसारमाध्यमांमध्ये फिरत आहे, त्याविषयी बोलताना, राठोड यांच्या राजीनाम्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला असेल, तर याविषयी ते जाहीर करतील. मी त्याविषयी बोलणं बरोबर नाही. पण, राजीनाम्याची माहिती चुकीची आहे. सर्व गोष्टी या कायद्याच्या चौकटीत राहूनच झाल्या पाहिजेत. विरोधी पक्षात आहात म्हणून बेधुंद गोळीबार करणं योग्य नाही. या प्रकरणाचा शिवसेनेच्या प्रतिमेला कोणताही फटका बसणार नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- पूजा चव्हाण प्रकरणी नियमानुसारच चौकशी- अनिल देशमुख

संजय राठोड यांच्यावरील आरोपांबाबत अद्याप तरी शिवसेना (shiv sena) नेते मौन धारण करून बसले हाेते. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या नेत्याने यावर भाष्य केलं आहे. 

पुण्यातील पूजा चव्हाण नावाच्या तरूणीच्या आत्महत्येनंतर काही आॅडियो क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. त्यावरून भाजपने संजय राठोड यांच्यावर आरोप करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. पोलिसांवर दबाव टाकण्यात येत असल्याचंही भाजपचं म्हणणं आहे. एवढंच नाही, तर मागील आठवडाभरापासून संजय राठोड गायब असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यासाठीही भाजपकडून (bjp) सातत्याने राज्य सरकारवर दबाव टाकण्यात येत आहे. 

त्यावर खुलासा करताना संजय राठोड कुठं आहेत? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी गृहखात्याचा मंत्री म्हणून सांगतो की, याप्रकरणी नियमानुसार चौकशी व कारवाई होणार आहे. जे काही सत्य असेल ते महाराष्ट्रासमोर येईल. एकदा संपूर्ण चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर, वस्तूस्थितीसमोर आल्यानंतर राज्य शासन त्यावर निर्णय घेईल. पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. विरोधीपक्ष ज्या पद्धतीचे आरोप करत आहेत, त्या आरोपात काही तथ्य नाही, असं अनिल देशमुख (anil deshmukh) म्हणाले.

(shiv sena mp sanjay raut backs sanjay rathod in pooja chavan suicide case prob)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा