१४४ जागा न मिळाल्यास युती तुटेल, दिवाकर रावते यांचा इशारा?

भाजपाने जर शिवसेनेला १४४ जागा सोडल्या नाहीत, तर युती तुटू शकते, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले आहेत.

SHARE

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपामधील जागा वाटपाचा तिढा सुटण्याऐवजी अधिकच गुंतागुंतीचा बनत चालला आहे. भाजपाने जर शिवसेनेला १४४ जागा सोडल्या नाहीत, तर युती तुटू शकते, असं खळबळजनक वक्तव्य शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले आहेत. रावते यांच्या भूमिकेचं खासदार संजय राऊत यांनी देखील समर्थन केल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. 

५०-५० चा फाॅर्म्युला 

एका बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरलेला असताना युतीच्या जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडलेलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीत ५०-५० जागा वाटपाचा फाॅर्म्युला ठरला होता. 

शिवसेनेची भूमिका

या फाॅर्म्युल्यानुसार विधानसभेच्या २८८ जागांपैकी १८ जागा मित्रपक्षांना देऊन उरलेल्या (१३५-१३५) जागा दोघांमध्ये वाटून घेण्यावर एकमत झालं होतं. परंतु मित्रपक्ष हे भाजपने जोडलेले असल्याने भाजपने आपल्या कोट्यातून जागा द्याव्यात अशी शिवसेनेची भूमिका होती. त्यामुळे १४४ जागा नाही, तर किमान १३५ जागा तरी मिळाव्यात अशी शिवसेनेची अपेक्षा असताना भाजप दबावतंत्राचा वापर करत शिवसेनेला ११० जागांवर रोखू पहात असल्याची सूत्रांची माहिती आहे.     

युतीनेच लढू

त्यावर प्रतिक्रिया देताना 'शिवसेनेला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटू शकते,' असं वक्तव्य रावते यांनी केलं. तर 'अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फिफ्टी-फिफ्टी जागांचा फॉर्म्युला निश्चित झालेला असल्याने रावते जे बोलले त्यात काहीच गैर नाही,' असं समर्थन राऊत यांनी केलं आहे. शिवाय काहीही झालं तरी विधानसभा निवडणुका सोबतच लढू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.हेही वाचा-

शिवसेनेकडून १० आमदारांना डच्चू? यादीत कुणाची नावे?

निवडणूक खर्चाची मर्यादा ‘इतक्या’ लाखांपर्यंत वाढवा, शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे मागणीसंबंधित विषय
ताज्या बातम्या