• घटस्फोटाचा स्फोट नाहीच!
SHARE

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार, भाजपाला घटस्फोट देणार अशी जोरदार चर्चा प्रसारमाध्यमांसह राजकीय वर्तुळात रंगली. त्यानुसार सायंकाळी ५ वाजता शिवसेना भवन इथं होणाऱ्या सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं होतं. ५ वाजता उद्धव ठाकरे सेना भवनात आले, त्यांनी बोलण्यास सुरूवात केली, पालघर निवडणुकांविषयी बोलले, वनगा परिवाराबद्दल बोलले, योगीची-भाजपावर निशाणा साधला, निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं, निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाण्याचे संकेतही दिले पण घटस्फोटाचा स्फोट काही केला नाही.


राजीनामे खिशातच

सत्तेतून बाहेर पडण्याचा चकार शब्दही उद्धव ठाकरे यांनी न काढता पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात घटस्फोटाची अर्थात सत्तेतून बाहेर पडण्याची रंगलेली चर्चा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी खोटी ठरवली. नेहमीप्रमाणं सेनेच्या आमदारांचे राजीनामे खिशातच राहिले नि उद्धव आल्याप्रमाणे निघून गेले.तुझं माझं जमेना, सत्तेशिवाय करमेना

सत्तेत एकत्र आहेत, पण एकमेकांचं जमत नाही, एकमेकांवर सडकून टीका करायची, एकमेकांना धमक्या द्यायच्या पण सत्ता काही सोडायची नाही असं भाजपा-सेना युतीच्या बाबतीतचं चित्र आहे. भाजपा-सेनेचं सुरूवातीपासूनच बिनसलं असून गेल्या काही महिन्यात दोघांमधून निखाराही जात नसल्याचं चित्र आहे.


संबंध आणखी ताणले

त्यातच पालघर निवडणुकादरम्यान दोघांमध्ये ज्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या, दोघ एकमेकांविरोधात लढले त्यावरून भाजपा-सेनेतील संबंध आणखी ताणल्याचं स्पष्ट झालं. तर पोटनिवडणुकीत नाट्य आणि गुरूवारच्या निकालानंतर हे संबंध आणखी ताणले गेल्याचं म्हणत घटस्फोटाचीच चर्चा रंगली. पण उद्धव ठाकरे यांनी सत्तेतून बाहेर पडण्याबाबत ब्र ही न काढल्यानं घटस्फोटाच्या बातम्या पेरणारेच तोंडघशी पडले.


काय म्हणाले उद्धव?

 • पालघरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढलो
 • त्या माध्यमातून पालघरमधील घराघरात धनुष्यबाण गेला
 • भाजपाचा हा विजय निसटता आहे
 • शिवरायांचा अपमान करणाऱ्या योगीबद्दल भाजपा ब्र ही काढत नाही
 • हीच भाजपाची शिवभक्ती
 • शिवरायांचा अपमान करणाऱ्या योगीची मस्ती उत्तर प्रदेशातील जनतेनं आज उतरवली
 • ११ जागांपैकी केवळ २ जागा भाजपाला वाचवता आल्या, त्यातून भाजपाला जनता नाकारत असल्याचंच समोर येतंय
 • ईव्हीएमबद्दल अनेक तक्रारी, मशिन हॅक होताहेत, हॅक केल्या जाताहेत
 • निवडणूक आयोग नव्हे बागुलबुवा
 • निवडणूक आयोगाच्या मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह
 • निवडणूक आयुक्तांचा मतदान प्रक्रियेवर ताबा आहे का? हाच खरा प्रश्न
 • निवडणूक आयुक्तांची नियुक्ती नव्हे आता निवड झाली पाहिजे
 • सर्व पक्षांनी आता मतदान प्रक्रियेविषयी एकत्र येण्याची गरज
 • रात्रीस खेळ चाले, एका रात्रीत लाखभर मत कशी वाढतात?
 • ऊन लागून मशिन बंद पडत असतील तर मग काय रात्री आयपीएलप्रमाणं मतदान घ्यायच का?
 • आयपीएलप्रमाणे इतर देशातील अंपायर असतात त्याप्रमाणे बाहेरच्या देशातील निरीक्षक आणायचं का निवडणुकीसाठी
 • गरज पडल्यास निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाऊ
संबंधित विषय
ताज्या बातम्या