SHARE

शेतकऱ्यांचे समाधान होत नाही, तोपर्यंत हा महामार्ग होणार नाही अशी भूमिका शिवसेनेची कालही होती अन् आजही आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, ही आमची भूमिका आहे. समृद्धी महामार्गसाठी शेतकऱ्यांच्या संमतीनेच जमिन खरेदी करण्यात आल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेच्या उपनेत्या निलम गोऱ्हे या देखील उपस्थित होते. मी स्वतः मंत्री एकनाथ शिंदे यांना शेतकऱ्यांना भेटायला सांगितले होते. पहिल्यांदाच मंत्र्यांनी स्वत: शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केल्याचेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.


विकास होताना कुणाच्याही स्वप्नांचा चुराडा होता नये 


विकास व्हावा मात्र तो होताना कुणाच्याही स्वप्नांचा चुराडा होऊ नये या मताची शिवसेना आहे. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती होणार नाही. असे सांगत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आधी कार्यकर्ते आहेत आणि मग मंत्री असे सांगितले. या महामार्गात शेतकऱ्यांची सुपीक जमीन जाऊ नये तसेच शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा ही आमची भूमिका कायम असल्याचेही ते यावेळी म्हणालेत.


प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या खोट्या 

मंत्र्यांची भूमिका वेगळी आणि पक्षप्रमुखांची भूमिका वेगळी अशा बातम्या प्रसारित झाल्या, त्या चुकीच्या आहेत. पक्षप्रमुख आणि पक्षापुढे मला मंत्रीपद प्रिय नाही. या प्रकल्पाला विरोध नाही. मात्र कोणत्याही शेतकऱ्यावर जबरदस्ती करायची नाही असे आदेश उद्धव साहेबांनी मला दिले होते. हिंगणी येथील शेतकरी स्वच्छेने आले होते. मी त्यांनाही विचारलं होतं की, तुम्ही स्वखुशीने आलात का ? तुम्हाला कोणी जबरदस्ती केली नाही ना ? त्यानंतरच त्यांच्या जमिनीची खरेदी करण्यात आल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.


अजित पवार घरी बसलेत 


शिवसेनेच्या भूमिकेबाबत शंका उपस्थित करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आता घरी बसलेत असा घणाघाती आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. तसेच जे काही करूच शकत नाहीत ते यामध्ये आग लावण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांच्या समाधानाशिवाय समृद्धी महामार्ग होऊ देणार नाही ही आमची भूमिका असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी समृद्धीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.


शिवसेनेची भूमिका म्हणजे निर्लज्जपणाचा कळस – तटकरे


दरम्यान,  समृद्धी महामार्गाबाबत शिवसेनेची भूमिका म्हणजे निर्लजपणाचा कळस असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. समृद्धी महामार्गाला आधी शेतकऱ्यांसाठी विरोध करण्याचे नाटक शिवसेनेने केले. मात्र दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हे समृद्धी महामार्ग भूसंपादन करारावर सही करतात,यासारखे दुटप्पी धोरण दुसरे नाही असं सांगत तटकरे यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेचा समाचार घेतला.


हेही वाचा - 

समृद्धी महामार्ग: ऑक्टोबरला काम सुरू, 2020 ला मुंबई-नागपूर 8 तासांत

'समृद्धी महामार्ग' रद्द करण्यासाठी नाशिकचे शेतकरी जाणार न्यायालयात

संबंधित विषय
ताज्या बातम्या