मुंबई महापालिका निवडणुकीत पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड शिवसेना गुजरात निवडणुकीत करणार आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक प्रचार कालावधीत गुजरात दौरा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेच्यावतीने अशाप्रकारची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अंतर्गत व्यूहरचनेबाबत शिवसेनेत चाचपणी सुरू असून यांत निवडणूक लढवावी का? याबाबतही विचारविनीमय सुरू आहे. शिवसेनेने यापूर्वी दोनदा गुजरात विधानसभा निवडणूक लढवली आहे. मात्र, या निवडणुकीत मतांचा टक्का वाढला असला तरी त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता.
बिहार, उत्तरप्रदेश आणि गोवा पाठोपाठ गुजरातमध्येही निवडणूक लढवावी का? यावरून पक्षातील नेत्यांमध्ये काथ्याकूट सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गड मानल्या जाणाऱ्या या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल देशभरात सूचक संदेश देणारे ठरणार याची शिवसेनेच्या धुरिणांना कल्पना आहे. याठिकाणी करिष्मा घडल्यास शिवसेना अधिक नावारूपाला येईल, असाही अंदाज त्यांना आहे. गुजरातमध्ये भाजपाविरोधी मते शिवसेनेकडे वळल्यास त्याचा भाजपाच्या राजकीय विरोधकांना फटका बसू शकतो याची कल्पनाही शिवसेनेच्या धुरिणांना आहे.
भाजपाचा अहंकार मोडणे यालाच या निवडणुकीत प्राधान्य राहणार आहे. यासाठी भाजपाच्या राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करण्याची रणनीती शिवसेना आखत आहे. यासाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलला पाठिंबा दर्शवण्यासाठी उद्धव ठाकरे निवडणूक प्रचार कालावधीत गुजरात दौरा करण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत दिलेल्या पाठींब्याची या माध्यमातून परतफेड करत उद्धव ठाकरे राजकीय खेळीचे फासे टाकणार आहेत, असे बोलले जात आहे.