Advertisement

नुसती जाळी काय कामाची? मंत्रालयात पोलिसांचं जाळंही कमकुवत, ४०० ऐवजी फक्त १७५ पोलिस

मंत्रालय सुरक्षेसाठी कागदावर ४०० पोलिस कॉन्स्टेबल्स मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यातले केवळ १७५ पोलिसच तैनात असतात, ही माहिती उघड केली.

नुसती जाळी काय कामाची? मंत्रालयात पोलिसांचं जाळंही कमकुवत, ४०० ऐवजी फक्त १७५ पोलिस
SHARES

मंत्रालयात वारंवार घडणाऱ्या आत्महत्येच्या घटनांनंतर मंत्रालयाच्या सुरक्षा यंत्रणेवर ताण पडल्याखेरीज इतर मोठा बदल दिसून आला नाही. सुरक्षेसाठी जाळी बसवण्याची तजवीज करण्यात आली. मात्र या जाळीचा काय आणि किती उपयोग होईल? या बद्दल सुरक्षा अधिकारीच साशंक आहेत. त्यामुळे सुरक्षा अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पाचव्या किंवा सहाव्या मजल्यावर आणखी एक जाळी बसवण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी तात्पुरती केलेली ही व्यवस्था सध्या तरी तकलादू दिसत असून मंत्रालयात सुरक्षा रक्षकांचं संख्याबळ वाढवण्याची गरज व्यक्त होत आहे.


सुरक्षा फक्त कागदावरच

मंत्रालयात अतिरिक्त पोलिस यंत्रणा तैनात ठेवण्याचा मंत्रालय प्रशासनाचा विचार आहे. यासाठी मंत्रालयात किती फौजफाटा लागेल याचा विचार करून त्याचा प्रस्ताव सरकारसमोर मांडण्यात येणार असल्याचं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं. हे सांगत असतानाच मंत्रालय सुरक्षेसाठी कागदावर ४०० पोलिस कॉन्स्टेबल्स मंजूर करण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यातले केवळ १७५ पोलिसच तैनात असतात, ही माहिती उघड केली.


पाठपुरावा करूनही दुर्लक्ष

मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह आणि प्रशासकीय इमारत या तिन्ही इमारतींसाठी हे संख्याबळ पुरवण्यात आलं आहे. यामध्ये मंत्रालयाचे तीन प्रवेशद्वार, प्रशासकीय इमारतीचे २ आणि सह्याद्रीचे २ प्रवेशद्वार यांचा समावेश होतो. गेल्या काही वर्षांपासून आयुक्त कार्यालयात पाठपुरावा करुनही हे संख्याबळ वाढवण्यात यश न आल्याची खंत सुरक्षा अधिकाऱ्याने व्यक्त केली.


उसनवारीवर २० पोलिस

महत्वाचं म्हणजे गुरूवारच्या घटनेनंतर अतीरिक्त आयुक्तांनी केवळ २० पोलीस उसनवारी तत्वावर दिलेले आहेत. हे पोलिसही कायमस्वरुपी नाहीत. त्यामुळे आहे त्या पोलिसांमधे कशी सुरक्षा द्यायची हा प्रश्न मंत्रालयातल्या पोलिस अधिकाऱ्यांना पडला आहे.


सततचा ताण कितीकाळ?

दोन वर्षांपूर्वी मंत्रालयात अशीच एक गंभीर घटना घडली, तेव्हा १०० पोलिस वाढवण्यात आले होते. त्यानंतर ५० आणि आता केवळ २० वाढील पोलिस देण्यात आले आहेत. मंत्रालयात दररोज ३ ते ३ हजार ५०० नागरिक आपापली कामे घेऊन मंत्र्यांच्या भेटीसाठी येतात. मंत्रिमंडळा बैठकीच्या दिवशी तर ही संख्या ५ ते ६ हजारापर्यंत जाते, अशी माहितीही या पोलिस अधिकाऱ्याने दिली. अशा सततच्या युद्धजन्य परिस्थितीचा
ताण आमचे कर्मचारी किती काळ सहन करणार हाच खरा प्रश्न असल्याचं ते म्हणाले.



हेही वाचा-

मंत्रालयात संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम...

पाऊले चालती 'सुसाईड पॉईंट'ची वाट..!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा