भाजपसमोर गुडघे टेकू नका, अबू आझमींचा राज ठाकरेंना खोचक सल्ला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसमोर गुडघे टेकू नये, असा सल्ला समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.

SHARE

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झेंड्याचा रंग बदलून केशरी होणार असल्याची चर्चा आहे. शिवाय मनसेने हिंदुत्ववादी भूमिका स्वीकारल्यास भविष्यात भाजप-मनसे युती शक्य असल्याच्या बातम्यांनाही जोर आला आहे. त्यावर मत मांडताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपसमोर गुडघे टेकू नये, असा सल्ला समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी दिला आहे.

येत्या २३ जानेवारी रोजी मनसेचं पहिलं महाअधिवेशन होत आहे. या अधिवेशनात राज ठाकरे पक्षाची नवी भूमिका जाहीर करतील, असं म्हटलं जात आहे. ही भूमिका हिंदुत्वाची असून त्याचसाठी पक्षाच्या झेंड्याचा रंगही बदलण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना भाजपासून दूर झाल्याने ही पोकळी मनसेच्या रूपात भरून निघू शकते, असं राजकीय विश्लेषक म्हणत आहेत. यावर भाजप आणि मनसे अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून मागील काही दिवसांमध्ये प्रतिक्रिया देण्यात आल्या. 

हेही वाचा- गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा

राज ठाकरे आणि भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसेला सर्व पर्याय खुले असल्याचं मत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केलं होतं. तर फडणवीस यांच्यासहीत सुधीर मुनगंटीवार आणि गिरीश महाजन यांनी मनसेची विचारधारा बदलल्यास भविष्यात युती शक्य असल्याचं वक्तव्य करण्यात आलं.  

त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना अबू आझमी म्हणाले की, राज ठाकरे हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी ठाकरे घराण्याचा मान राखून केवळ राजकीय फायद्यासाठी भाजपसमोर गुडघे टेकू नये. शिवाय वारंवार थुंकी चाटणं योग्य नसल्याची टीकाही त्यांनी राज ठाकरेंवर केली.    

त्यामुळे आतापर्यंत भाजपवर टीका करणारे राज ठाकरे ही युती स्वीकारतील का? यावर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या आहेत.

हेही वाचा- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना-मनसेचं शक्तीप्रदर्शन 

 

संबंधित विषय
ताज्या बातम्या