तावडेंच्या मदतीला धावले राणे- तटकरे

  Mumbai
  तावडेंच्या मदतीला धावले राणे- तटकरे
  मुंबई  -  

  मुंबई विद्यापीठाच्या निकालाला लागणारा उशीर तसेच मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराला राज्याचे तंत्र आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेना आमदार अनिल परब यांनी त्यांच्याविरोधात विशेषाधिकार हक्कभंग विधान परिषदेत पटलावर मांडला. मात्र शिवसेनेच्या या हक्कभंगावर काँग्रेस आमदार नारायण राणे आणि सुनील तटकरे यांनी आक्षेप घेत आधी राजीनामा देऊन सत्तेतून बाहेर पडा त्यानंतरच तावडेंवर हक्कभंग आणा, असे म्हणत परब यांच्यावर तोफ डागली.


  मुंबई विद्यापीठाचे रखडलेले निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिलेली ३१ जुलैची डेडलाईन पाळण्यात विद्यापीठ सपशेल नापास झाले असून आता मुंबई विद्यापीठाला ५ ऑगस्टची नवी डेडलाईन देण्यात आली आहे. 


  सत्तेत एकत्र आहात मग हक्कभंग कशाला?

  भाजपाच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसताना शिवसेना हक्कभंग आणू तरी कसा शकते? असा सवाल काँग्रेस आमदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. यावेळी राणेंच्या सूरात सूर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील मिसळला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले की, सरकारमध्ये राहायचे आणि हक्कभंग मांडायचा ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे.


  काय म्हणाले अनिल परब?

  विद्यपीठाचा कॉमर्सचा शेवटचा पेपर ३० एप्रिलला झाला. त्याचा निकाला ४५ दिवसांत लागणे अपेक्षित होते. ऑनलाइन पेपर तपासणी करायची होती तर त्याची सूचना आधी द्यायला हवी होती. ज्यांच्यावर निकाल लावण्याची जबाबदारी आहे, त्या पदांच्या बाबतीत सरकार गंभीर नाही. रजिस्ट्रार, प्रो व्हाईस चान्सलर अशी पदे रिक्त आहेत, त्यामुळे आम्ही कुलगुरू आणि शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केली, तेव्हा आमचा अभ्यास कच्चा आहे, असे म्हणत आमची थट्टा करण्यात आली, असे परब सभागृहात म्हणाले.

  दरम्यान उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी परब यांचा प्रस्ताव स्वीकारत तावडे यांनीही खुलासा करावा, असे निर्देश दिले आहेत.  हे देखील वाचा -

  विद्यापीठ निकालांवरुन राज्यपाल विरूद्ध कुलगुरू?


   

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.