Advertisement

१६ जुलैला मुंबईचं दूध रोखणारच - राजू शेट्टी यांचा इशारा


१६ जुलैला मुंबईचं दूध रोखणारच - राजू शेट्टी यांचा इशारा
SHARES

दूध उत्पादकांच्या दूध आंदोलनावरून आता चांगलंच राजकारण तापू लागलंय. १६ जुलैपासून मुंबईचं दूध रोखण्याचा इशारा देणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिवार करत दूध रोखूनच दाखवा, असं आव्हान दिलं आहे. तर शेट्टी यांनी हे आव्हान स्वीकारत १६ जुलैला मुंबईत एक थेंबही दूध येऊ देणार नाही, मुंबईचं दूध रोखणारच असा पुनरूच्चार केला आहे. शेतकऱ्यांना, दूध उत्पादकांना रोखण्यासाठी राज्य सरकारनं हवे ते प्रयत्न करावेत, पण आम्ही आता शांत बसणार नाही, असं म्हणत गरज पडल्यास कायदा हातात घेऊ, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.


२७ रुपये हमीभाव द्या

दुधाला २७ रुपये प्रति लिटर हमीभाव देत दूध उत्पादकांना आर्थिक संकटातून बाहेर काढावं, असं म्हणत शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १६ जुलैपासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे. राज्यभर आंदोलन सुरू राहिलंच. पण सरकारला जागं करायचं असेल तर राज्याच्या राजधानीचं मुंबईचं दूध रोखायचं, असं म्हणत शेट्टी यांनी १६ जुलैला मुंबईला दुधाचा एक थेंबही येऊ दिलं जाणार नाही, असं म्हटलं आहे.


चंद्रकांत पाटलांचंही अाव्हान

दुध उत्पादकांच्या आंदोलनात मुंबईकरांना वेठीस का धरायचं आणि दुधाचा नाश का करायचा असा प्रश्न आता या आंदोलनाच्या निमित्तानं निर्माण झाला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनीही शेट्टी यांना आव्हान दिलं आहे. त्यानुसार शनिवारी शेट्टी यांनी मुंबईत एक पत्रकार परिषद घेत सरकारनं त्यांना काय करायचं ते करावं, आम्ही मुंबईच दूध रोखणारच, असं उत्तर पाटील यांना दिलं आहे.


परराज्यातून अाणून तर दाखवा

सरकारनं परराज्यातून दुध मुंबईत आणण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला आहे. तर पाटील यांना दूध प्रश्नावर काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, दूध उत्पादकांसाठी पाटील यांनी काय केलं आहे ते सांगावं आणि नंतर बोलावं असं म्हणत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.


हेही वाचा -

मुंबई पाकिस्तानात आहे का? दूध रोखून दाखवाच - चंद्रकांत पाटील

स्वातंत्र्याच्या लढाईत ख्रिश्चन इंग्रजांच्या बाजूने, खासदार गोपाळ शेट्टींचं वादग्रस्त वक्तव्य



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा