Advertisement

महाराष्ट्रात राजकीय वारसा चालवणारे ८ युवा नेते

मनसेच्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं राजकारणात पदार्पण झालं. अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर महाराष्ट्रातल्या राजकारणातील घराणेशाहीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली.

महाराष्ट्रात राजकीय वारसा चालवणारे ८ युवा नेते
SHARES

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या वहिल्या महाअधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं राजकारणात पदार्पण झालं. अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीनंतर ठाकरे कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात आल्याने महाराष्ट्रातल्या राजकारणातील घराणेशाहीची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली. 

ज्याप्रमाणे अभिनेत्याचा मुलगा अभिनेता, डाॅक्टरचा मुलगा डाॅक्टर आणि इंजिनीअरचा मुलगा इंजिनीअर होऊ शकतो, त्याप्रमाणे राजकारण्याचा मुलगा राजकारणी का होऊ शकत नाही, असा सवालही अनेकजण करतात. नेत्यांच्या मुलांमध्ये क्षमता असेल, इच्छा असेल, तर त्यांनी जरूर राजकारणात यावं असं अनेक नेत्यांचं यावर उत्तर असतं. अशा स्थितीत महाराष्ट्राच्या राजकारणात कुठले नेते कार्यरत आहेत, जे आपल्या कुटुंबाचा राजकीय वारसा पुढं चालवत आहेत, यावर एक नजर टाकूया.

  • आदित्य ठाकरे - शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असलेले आदित्य मुंबईतील वरळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरुन थेट निवडणूक लढवणारे आदित्य ठाकरे कुटुंबातील पहिलेच सदस्य आहेत. सध्या त्यांच्या खांद्यावर पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी आहे.
  • रोहित पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार राष्ट्रवादीतील युवा नेतृत्व म्हणून पुढं आले आहेत. कर्जत-जामखेड मतदारसंघातून रोहित मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यांनी भाजपचे मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. स्थानिक पातळीवरील राजकारणाचाही रोहित यांना चांगला अनुभव आहे.
  • झिशान सिद्दीकी - काँग्रेसचे माजी आमदार आणि नेहमीच चर्चेत राहणारे नेते बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव असलेले झिशान वांद्रे पूर्व मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेले आहेत. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव करत झिशान यांनी शिवसेनेला या निवडणुकीत मोठा धक्का दिला होता. याच मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचंही घर येतं. 
  • अमित देशमुख - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव असलेले अमित देशमुख यांनी लातूर शहर मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक जिंकत विधानसभेत पाऊल टाकलं. सध्याच्या ठाकरे सरकारमध्ये ते अन्न आणि प्रशासन, पर्यटन राज्यमंत्री आहेत. वयाच्या २१ व्या वर्षीच त्यांनी रााजकारणात पदार्पण केलं होतं. तसंच आघाडी सरकारमध्ये ते पर्यटनमंत्री देखील होते.
  • धीरज देशमुख -  विलासराव देशमुख यांचे चिरंजीव आणि अमित देशमुख यांचे लहान बंधू असलेल्या धीरज यांचं राजकारणातलं पदार्पणही मोठ्या थाटात झालं. धीरज लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यांनी शिवसेनेच्या रामराजे देशमुख यांचा मोठा पराभव केला. या निवडणुकीत देशमुख यांचं डिपाॅझिटही रद्द झालं. अभिनेता रितेश देशमुख याने दोन्ही भावांसाठी निवडणूक प्रचार केला होता.
  • आदिती तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेवर गेल्या आहेत. त्यांनी शिवसेनेचे विनोद घोसाळकर यांचा पराभव केला. आदिती यांना राजकारणाचा उत्तम अनुभव असून याआधी त्या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा देखील होत्या.
  • विश्वजीत कदम - हे काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. सांगलीतील पलूस-कडेगाव या विधानसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधीत्व करतात. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसकडून विश्वजीत यांना उमेदवारी देण्यात आली होती. विश्वजीत सध्या ठाकरे सरकारमध्ये कृषी आणि सहकार राज्यमंत्री आहेत. 
  • ऋतुराज पाटील - हे बिहारचे माजी राज्यपाल आणि काँग्रेस नेते डी. वाय. पाटील यांचे नातू तसंच संजय पाटील यांचे चिरंजीव आहेत. तर राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ते पुतणे आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ते विधानसभेवर निवडून गेले आहेत.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा