संजय राऊतांची कोर्टात साक्ष

 Mumbai
 संजय राऊतांची कोर्टात साक्ष

मुंबई -  बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्र वादाप्रकरणी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात शिवसेना खासदार संजय राऊत यांची साक्ष झाली. सामना वृत्तपत्रात गेली दोन दशकं काम करत असून, मला पूर्णपणे स्वातंत्र्य आहे पण काही महत्त्वाच्या वृत्तासांठी बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांना विचारावे लागायचे. तसेच जयदेव ठाकरे सामनामध्ये काॅलम लिहायचे असंही यावेळी साक्ष देताना संजय राऊत यांनी सांगितलं.  

बाळासाहेब ठाकरे  संपत्ती वाद प्रकरणात संजय राऊत हे साक्षीदार आहेत. त्यांना मुंबई उच्च न्यायालयानं साक्षीकरता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, संजय राऊत साक्षीकरता मुंबई उच्च न्यायालयात हजर न राहिल्यानं न्यायालयानं संताप व्यक्त करत संजय राऊत यांना आजच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. यावेळी जर संजय राऊत साक्षीकरता हजर राहिले नाही तर त्यांना कोर्टात आणले जाईल अशा शब्दात न्यायालयाने संजय राऊत यांना खडसावले होते.

डिसेंबर २०११ साली बाळासाहेब ठाकरेंनी आले मृत्यूपत्र तयार केले होते. ज्यात त्यांच्या मालमत्तेचा बराचसा भाग हा उद्धव आणि त्यांच्या कुटुंबाला देण्यात आला होता. ज्यावेळी बाळासाहेबांनी मृत्यूपत्र बनवले होते तेव्हा ते मृत्यूपत्र बनवण्याच्या मानसिकतेत नव्हते असा दावा करत जयदेव ठाकरे कोर्टात गेले होते, ज्यात सामानाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना देखील साक्षीदार बनवण्यात आले आहे.

Loading Comments