Advertisement

आयुक्तांनी महापौरांना पुन्हा फाट्यावर मारले!


आयुक्तांनी महापौरांना पुन्हा फाट्यावर मारले!
SHARES

माहुलमधील प्रकल्पबाधितांच्या वसाहतींची पाहणी करण्यास गेलेल्या महापौरांसह गटनेते व अध्यक्षांच्या दौऱ्याला महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत संजय मुखर्जी आणि आबासाहेब जऱ्हाड हे दोन्ही अतिरिक्त आयुक्त गैरहजर राहिल्यामुळे महापालिका सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परंतु आयुक्तांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी 'मी आधीच अधिकाऱ्यांसमवेत माहुलची पाहणी करुन आढावा घेतला' असं सांगत चक्क महापौर व नगरसेवकांची आपण गिनतीच करत नसल्याचे अप्रत्यक्ष सांगत त्यांना फाट्यावर मारले.


आयुक्त, नगरसेवकांना गृहीत धरतात

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृहनेते यशवंत जाधव यांनी माहुलमधील महापौरांनी सर्व गटनेते व अध्यक्षांसह केलेल्या पाहणीला आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनी गैरहजर राहून महापौरांचाच नव्हे, तर सर्व नगरसेवकांचा अवमान केला असल्याचा आरोप केला. आयुक्त नगरसेवकांना गृहीत धरत आहेत. त्यामुळे के-पूर्वचे सहायक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांच्याकडून नगरसेवकांच्या विरोधात आंदोलन केले जात असतानाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही की त्याचा अहवाल सादर केला जात नाही, अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.


माहुलची सुधारणा करणार

महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी यावेळी सभागृहात निवेदन करताना, आपल्या पाहणी दौऱ्यापूर्वी मी त्या माहुलमधील वसाहतीला भेट दिली होती. त्याचा आढावा घेऊन कशाप्रकारे सुधारणा करता येईल, याचाही प्रयत्न केला जात आहे. परंतु, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे हे आदेश महापौरांच्या आदेशानुसार आपल्या सर्वांच्यासमोर ठेवतो, असे सांगितले.


शिवसेनेचे नगरसेवक म्यॅव

महापौरांचा अवमान केल्यामुळे शिवसेनेने हा मुद्दा उपस्थित करत आयुक्तांना घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु आयुक्तांनी, महापौरांसह नगरसेवकांनाही एकप्रकारे फाट्यावर मारल्यानंतरही याविरोधात शिवसेनेच्या एकाही नगरसेवकाने आवाज उठवला नाही की आयुक्तांना धारेवर धरले नाही. त्यामुळे आयुक्तांच्या समोर शिवसेनेचे नगरसेवक म्यॅव झालेले पाहायला मिळाले. सभागृहनेते यशवंत जाधव हे काही काळापुरता वरच्या पट्टीत आयुक्तांच्या विरोधात बोलले, परंतु प्रत्यक्षात आयुक्तांचा सभागृहात प्रवेश होताच आवाजाची पट्टी खाली आली होती.


स्थायी समिती अध्यक्षांनी घेतला भाजपाचा समाचार

सभागृहात आयुक्तांच्या विरोधात रान उठवण्याची रणनिती असतानाही प्रत्यक्षात आयुक्त समोर असताना कोणीही त्यांच्याविराधात बोलण्याची हिंमत दाखवली नाही. स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी सभागृहात दमदार आवेशात बाजू मांडताना जैन प्रकरणाचा समाचार घेतला. परंतु आयुक्तांविरोधात एक साधा 'ब्र' देखील काढला नाही. उलट एका बाजूला शांतता पसरली आहे, असे सांगत भाजपाचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचा समाचार भाजपाचे मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांनी घेत शिवसेनेच्या फुग्यातील हवाच काढून टाकली.


अधिकाऱ्यांना सांगे आयुक्त बह्मज्ञान!

देवेंद्रकुमार जैन प्रकरणी त्या विभागातील नगरसेवक, उपायुक्त तसेच जैन यासर्वांची आपण एकत्र बैठक घेऊन सोक्षमोक्ष आपण लावू, असे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सांगितले. यावेळी त्यांनी आपण जैन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकप्रतिनिधींचा आदर राखला जावा, त्यांना सोबत घेऊनच नागरी सुविधांची कामे करावीत, अशा सूचना केल्या आहेत. परंतु, एका बाजुला लोकप्रतिनिधींचा आदर करण्याचे बाळकडू पाजणाऱ्या आयुक्तांकडूनच महापौरांसह नगरसेवकांचा सन्मान केला जात नाही, हे दिसून आले.


देवेंद्रकुमार जैन यांना त्वरीत निलंबित करा

देवेंद्रकुमार जैन यांनी नगरसेवकांचा अपमान केला आहे, त्यामुळे जैन यांचे वर्तन क्षमास पात्र नाही. त्यामुळे त्यांचे त्वरीत निलंबन करण्यात यावे, किंबहुना त्यांची बदली लोकप्रतिनिधींचा संपर्क नसेल अशा ठिकाणी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी केली. जैन यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याची मागणी शिवसेनेच्या बाळा नर, रमेश कोरगावकर, मंगेश सातमकर, यशवंत जाधव आदींनी केली आहे.



हेही वाचा

माहुलमधील वसाहतीच्या सुविधांसाठी ३०० कोटी; भाजपाची मागणी



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा